सातारा : पालिका निवडणुकीसाठी चिन्ह वाटपाचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित शनिवारी पार पडला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीतर्फे मागणी केलेली काठी चिन्ह ‘नाविआ’ला देण्यात आले. तर खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीतर्फे मागणी केलेले शिटी हे चिन्ह ‘साविआ’ला मिळाले. भाजपला कमळ, शिवसेनेला धनुष्यबाण, मनसेला रेल्वे इंजिन ही पक्ष चिन्हे देण्यात आली. पालिकेच्या निवडणुकीतून तब्बल ५० जणांनी शुक्रवारअखेर माघार घेतली आहे. निवडणूक अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपली असल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४ जणांनी माघार घेतल्याने नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार रिंगणात उरले आहेत. तर ४० नगरसेवकपदांसाठी ४६ जणांनी माघार घेतल्याने १७८ उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत. याची अधिकृत माहिती शनिवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली. शनिवारी पालिकेच्या छ. शिवाजी सभागृहात चिन्ह वाटप कार्यक्रम पार पडला. भारतीय जनता पार्टी, शिवसेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीपीएम या तिन्ही पक्षांना अधिकृत चिन्हे असल्याने या पक्षांतर्फे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना पक्षीय चिन्हे देण्यात आली. सातारा विकास आघाडीच्या वतीने शिट्टी हे चिन्ह मागण्यात आले. नगराध्यक्षपदासह त्यांच्या ४० उमेदवारांना शिट्टी हे चिन्ह देण्यात आले. नगरविकास आघाडीने काठी हे चिन्ह मागितले नगराध्यक्षपदासह त्यांच्या ४० उमेदवारांना काठी चिन्ह देण्यात आले. महाराष्ट्र नागरी विकास आघाडीने भारिप बहुजन महासंघ, शहर सुधार समिती, लाल निशाण पक्ष यांनी आघाडी केली आहे. या आघाडीतर्फे ‘कपबशी’ हे चिन्ह मागण्यात आले होते; परंतु ही आघाडी नोंदणीकृत नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या आघाडीतील उमेदवारांना गॅस सिलिंडर, मक्याचे कणीस अशी चिन्हे दिली. इतर अपक्षांनाही यावेळी चिन्हे देण्यात आली. यापैकी अनेकांनी चिन्ह गौण आहे. लोक उमेदवार पाहूनच मतदान करतील, अशा प्रतिक्रिया सभागृहातून बाहेर पडताना दिल्या. (प्रतिनिधी) शिट्टी वाजवतच वसंत लेवेंची धूम! नगरविकास आघाडीतून सातारा विकास आघाडीत दाखल झालेले माजी नगरसेवक वसंत लेवे शनिवारी हसतमुखानेच पालिकेतून बाहेर पडले. एका बाईकवर मागे बसलेल्या लेवे यांनी जोरदार शिट्टी वाजविली. या शिट्टीने सर्वांचेच लक्ष वेधले. काँगे्रसचा हात कायम काँगे्रसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार धनश्री महाडिक यांनी उदयनराजे व दमयंतीराजेंच्या शब्दाला मान देऊन शुक्रवारी उमेदवारी अर्ज काढून घेतला होता. यानंतर काँगे्रसच्या उर्वरित उमेदवारांचे काय? हा प्रश्न उपस्थित केला गेला; परंतु काँगे्रसचे सादिक खान व मनिषा साळुंखे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला असून, त्यांना हात हे पक्ष चिन्ह देण्यात आले. चिठ्ठीची लॉटरी ‘रासप’ला राष्ट्रीय समाज पक्ष व महाराष्ट्र नागरी विकास आघाडीतर्फे ‘कपबशी’ या चिन्हाची मागणी करण्यात आली. यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठी पद्धतीने लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला. चिठ्ठीचा कौल ‘रासप’च्या बाजूने लागल्याने त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला हे चिन्ह देण्यात आले.
शिवेंद्रसिंहराजेंची काठी अन् उदयनराजेंची शिट्टी!
By admin | Published: November 13, 2016 12:05 AM