परळी : सातारा, जावळीच्या डोंगर कपारीत आठ दिवसांपासून पावसाने हाहाकार केला होता. कास, ठोसेघर, पांगारे पठारावरील रस्ते तर दरडी पडल्याने वाहतुकीसाठी बंद होते. अनेक गावे संपर्कहीन झाली होती. या परिसरातील गावे ही अतिपर्जन्यमान पट्टय़ातच येतात. त्यातच पावसाने सरासरीची मर्यादा ओलांडून दुप्पट-तिप्पट प्रमाणात पडल्याने हाहाकार झाला होता. या नुकसानीची आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाहणी केली.
अतिवृष्टीची तमा न बाळगता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुंगिलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे, संजय उत्तुरे, उपअभियंता राहुल अहिरे, शाखा अभियंता रवी अंबेकर, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पेशवे यांच्यासमवेत जाऊन पाहणी केली.
यामध्ये कासाणी, घाटाई, झुंगटी, शिंदेवाडी करंजे, लावंघर, कुस बुद्रुक, रेवंडे, वावदरे, राजापुरी, बोंडारवाडी, पांगारे अशा ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना देत हे रस्ते पूर्ववत सुरूही केले. शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांनी शेतीच्या नुकसानीसह घरांच्या पडझडीची पाहणी केली.