सातारा : साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंगळवारी रात्री साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर बुधवारी सकाळीच त्यांना पुढील तपासणीसाठी मुंबईला नेण्यात आले. रक्तदाब वाढल्याने त्यांना त्रास झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आमदार शिवेंद्रसिंहराजेंना अस्वस्थ वाटू लागले. कुटुंबीयांनी त्यांना साताºयातील खासगी रुग्णालयात नेलं. रात्री उशिरापर्यंत शिवेंद्रसिंहराजेप्रेमी कार्यकर्त्यांची रुग्णालयाच्या परिसरात मोठी गर्दी होती. तर आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रकृती अस्वास्थ्याविषयी माहिती मिळताच माजी खासदार उदयनराजे भोसले मध्यरात्री रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी उपचार करणाºया डॉक्टरांशी चर्चा करून आरोग्याबाबत माहिती घेतली.दरम्यान, बुधवारी सकाळी अधिक तपासण्यांसाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले मुंबईला रवाना झाले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांना सलग काही कार्यक्रमांना उपस्थित राहणं, त्याचबरोबर मतदारसंघातील कामांसाठी मुंबई दौरे करावे लागले. जावळी तालुक्यातील बोंडारवाडी धरणप्रश्नी दिवसभर आंदोलनातही ते सहभागी झाले होते. मंगळवारी फलटण येथे घरगुती कार्यक्रमासाठीही त्यांचा प्रवास झाला होता.
सलग येणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासामुळे दगदग झाल्याने त्यांना त्रास झाला असावा, असं वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. तथापि काळजीचे कोणतेही कारण नाही, असे शिवेंद्रसिंहराजेंच्या नजीकच्या सूत्रांनी सांगितले.
अस्वस्थ वाटल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर झाली. पहाटे त्यांच्या हृदयाची अँजिओग्राफी करण्यात आली असून, त्यांना हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा, हृदयाचा कोणताही गंभीर आजार आढळून आला नाही. त्यांची प्रकृती स्थिर असून, काळजीचं कोणतंही कारण नाही.- डॉ. सोमनाथ साबळे, हृदयरोग तज्ज्ञ, सातारा
मी सिनियर आहे...!माजी खासदार उदयनराजे भोसले यांना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच ते पुण्यातून थेट रुग्णालयात दाखल झाले. आमदार शिवेंद्रसिंहराजेंना बघताच, कायं झालंय तुम्हाला... लक्षात ठेवा मी सिनियर आहे... असं ऐकवलं. उदयनराजेंच्या या शब्दांमुळे काही क्षणांसाठी वातावरण भावनिक झालं. त्यानंतर त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना त्यांची काळजी घेण्याची आणि पथ्य पाळायला लावण्याची तंबी दिली. रुग्णालयातून बाहेर पडतानाही उदयनराजे यांचे डोळे पाणावले होते.