सातारा : ‘नगरपालिका निवडणुकीत डोळे उघडून निर्णय घ्या. कोणी मिठ्या मारतंय, पप्प्या घेतंय म्हणून मते देऊ नका,’ असं वक्तव्य नगरविकास आघाडीचे प्रमुख आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले करुन खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला.
शिवजयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक १९ मध्ये भाजप ओबीसी सेलच्या शहर महिला अध्यक्षा वनिता पवार व त्यांचे पती सचिन पवार यांनी रामाचा गोट भोई गल्ली समाज मंदिर येथे आयोजित केलेल्या मोफत नेत्र चिकित्सा व चष्मा वाटप शिबिरात ते बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपच्या प्रदेश महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णाताई पाटील, नगरसेवक विजयकुमार काटवटे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, नगरसेवक विजयकुमार काटवटे, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, माजी नगराध्यक्ष सचिन सारस, हेमांगी जोशी, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन साळुंखे, मनिषशेठ महाडवाले, राजेश माजगावकर, स्नेहा खैर, जयदीप ठुसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
"मोफत नेत्रतपासणी शिबिराच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना फायदा होणार आहे. आता डोळे तपासले आहेत तर सर्वांनीच डोळस होऊन पालिका निवडणुकीत मते द्यावीत. डोळे चांगले झाल्यानंतर योग्य पध्दतीने निर्णय घ्या. कोण मिठ्या मारतंय, पप्या घेतंय म्हणून मते देऊ नका," असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. या शिबिरामध्ये १३० लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली. मोतिबिंदू झालेल्या रुग्णांवर अल्प दरात शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती वनिता पवार यांनी दिली.