कोरेगाव : सलग तीन वर्ष टँकर लागणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील हिवरे गावात जलयुक्तमुळे केलेली कामे, मोठ्या प्रमाणातील लोकसहभाग आणि पडलेला पाऊस यातून हिवरे गावाच्या शिवारात पाणी तर खळाळले आहेच, त्याशिवाय हिरवीगार पिकं डोलू लागली आहेत. कोरेगाव तालुक्यातील हिवरे हे अवघे १ हजार ३७८ लोकसंख्या असलेले गाव. या गावामध्ये सलग तीन वर्षांपासून टँकर लागत असल्याची माहिती सरपंच अजित खताळ यांनी दिली. शासन, किसनवीर सहकारी साखर कारखाना आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून गावामध्ये साडेसतरा हजार मीटर डीपसीसीटी, ३0 हेक्टर सीसीटी, लहान मोठे ३६ मातीचे बंधारे, ३२ जुन्या पाझर तालवांमधून गाळ काढण्यात आला आणि काढण्यात आलेला गाळ शेतामध्ये टाकून जमीन वहिवाटीखाली आणली. एकूण ५४0 हेक्टर जमिनीपैकी जवळपास ५0 टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यात आली आहे. यामध्ये ऊस, आले, घेवडा, सोयाबीन, बाजरी, टोमॅटो यांचा समावेश आहे. ३३ एकर गायरान जमिनीत साडेपाच हजार सिताफळांची रोपे लावण्यात आली आहेत. यापासून साडेपाच लाखाचे उत्पन्न हे गावासाठी मिळणार आहे. एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम, ग्रामपंचायतीच्या १३ व्या वित्त आयोग, पर्यावरण निधी, ग्रामपंचायत स्व निधी, लोक वर्गणी यामधून गावामध्ये जलसंधारणाची कामे करण्यात आली. यामधून ८ कोटी लिटर पाणी अडविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, अशी माहिती सरपंच खताळ यांनी यावेळी अभिमानाने दिली. (प्रतिनिधी)गावामध्ये जलयुक्त शिवारची कामे झाल्यामुळे शिवारात पाणी खेळू लागले आहे. त्यामुळे आम्हाला आता टंचाई भासणार नाही. निश्चितपणे आम्ही आता बारमाही पिके घेऊ शकतो. टँकर लागणाऱ्या हिवरे गावात जलयुक्त शिवार अभियानामुळे शिवारात पाणी दिसू लागले आहे. याच पाण्यावर सध्या हिरवीगार पिकं डोलू लागली आहेत. हे दृष्य निश्चितच इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे. - हणमंत जगदाळे, शेतकरी पाच विंधन विहिरी घेतल्या. अगदी ३00 फुटापर्यंत परंतु पाणी लागले मिळाले नाही. गावात जलयुक्त शिवारची कामे झाल्यामुळे विंधन विहीर पाण्याने भरुन वाहत आहे. विहीर पण भरुन वाहत आहेत. ही शेतकऱ्यांसाठी समाधानाची बाब आहे. - शंकर खताळ, शेतकरी
जलयुक्तमुळे हिवरे झाले हिरवेगार..!
By admin | Published: August 26, 2016 12:34 AM