सागर गुजरसातारा : जावळी तालुक्यातील कुडाळ जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने मंगळवारी जाहीर केला. या निवडणुकीसाठी १२ डिसेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्यातील सत्तासंघर्ष उफाळून येणार आहे.
कुडाळ गटाचे तत्कालीन सदस्य दीपक पवार यांनी विधानसभा निवडणूक लढण्याआधी आपल्या जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. तो मंजूरही झाला. त्यानंतर पवारांनी राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश करून विधानसभेची निवडणूक लढवली होती.
दरम्यान, पवार हे या ठिकाणी सलग दोनवेळा निवडून आले होेते. जावळी विकास आघाडीच्या माध्यमातून एकदा आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीतून दुसºयांदा उमेदवारी करत सलग दोनवेळा त्यांनी या मतदारसंघात विजय मिळवला होता. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि माजी आमदार शशिकांत शिंदे यांची एकत्रित ताकद होती, तेव्हाही पवार विजयी झाले होते. मागील निवडणुकीत दीपक पवार यांनी शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा पराभव केला होता.आता शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपमध्ये तर दीपक पवार आणि शशिकांत शिंदे हे दोघे राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये असे चित्र आहे. तिन्ही नेत्यांचे तालुक्यात वेगवेगळे गट आहेत. परंपरागत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादीकडे राहिला नसल्याने आता पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी ताकद लावणार, हे स्पष्ट आहे. आता विधानसभा निवडणूक लढलेले दीपक पवार हे पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक लढणार का? हेही पाहण्याजोगे ठरणार आहे. पवार यांनी नकार दिल्यास या ठिकाणी शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार असतील. तर भाजपतर्फे दिवंगत आमदार लालसिंगराव शिंदे यांचे नातू सौरभ शिंदे यांना उमेदवारीची संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
दरम्यान, या निवडणुकीसाठी २२ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. अर्जांची छाननी २८ नोव्हेंबरला होणार आहे. वैध उमेदवारांची यादी त्याच दिवशी प्रसिद्ध केली जाईल. ४ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. १२ डिसेंबर रोजी मतदान होईल. तर १३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. संघर्ष कालही होता अन् आजही...!आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटांमध्ये जावळी तालुक्यात सुप्त सत्तासंघर्ष कायम राहिला आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत तो वेळोवेळी पाहायला मिळाला. आता तर दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षांत आहेत, त्यामुळे जावळी तालुक्यावर पकड मिळविण्यासाठी दोघांतील संघर्ष स्पष्टपणे पुढे दिसणार आहे.
कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे, त्यानंतरच कुडाळ गटाच्या पोटनिवडणुकीबाबत निर्णय घेतला जाईल. मी अजून काही ठरवलेलं नाही.- दीपक पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य कुडाळ