मांढरदेव : महाराष्ट्र सध्या मोठ्या दुष्काळाचा सामना करत आहे. गेल्यावर्षी फारच कमी प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याचे स्त्रोत आटत चालले आहेत. याचा फटका मानवासह इतर प्राण्यांनासुद्धा बसत आहे. पाण्यावाचून अनेक पशुपक्षी तडफडत आहेत. यातून ते पडत आहेत. यांचा विचार करून मांढरदेव येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व मावळा ग्रुपच्या सदस्यांनी स्वयंप्रेरणेने वाई, मांढरदेव व मांढरदेव-भोर घाटांमध्ये या पशु-पक्षांसाठी पाण्याची सोय करून शिवजल योजना सुरू केली आहे.मांढरदेव हे ठिकाण उंच डोंगरावर आहे. येथील डोंगरामध्ये विविध प्रकारचे प्राणी व पक्षी आहेत. यावर्षी पाऊस अत्यल्प पडल्याने डोंगरातील बहुतांशी झरे आटले आहेत. यातच पशुपक्षी पाण्यावाचून तडफडत आहेत. हे पाहता मांढरदेव व परिसरातील तरुणांनी एकत्र येऊन मांढरदेव-भोर व मांढरदेव-वाई या घाटांमध्ये जागो-जागी प्राण्यांना व पक्षांना पिण्यासाठी पाण्याचे डबे ठेवून पिण्यासाठी पाण्याची सोय केली आहे. पक्ष्यांसाठी अनेक ठिकाणी झाडांवर डबे ठेवण्यात आले आहेत. यामध्ये मांढरदेव, भिवजेवाडी, गडगेवाडी, कोचळेवाडी, वेरुळी या गावांतील तरुणवर्ग सहभागी झाला आहे. या डब्यांमध्ये तरुण वर्ग दररोज पाणी टाकण्याचे काम करत आहेत. पुढे पाऊस पडेपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवणार असल्याचे तरुणांनी सांगितले. पाणी टाकण्यासाठी मुलांचे गट करण्यात आले आहेत. तरुणांबरोबर ग्रामस्थ जीप संघटनांनी सुद्धा सहभाग घेतला आहे.डोंगरातील माकड, कोकर, पक्षी, साप यासारखे पशुपक्षी पाणी पिताना दिसत आहेत. तरुणांनी राबवलेल्या उपक्रमाचे या भागातील नागरिक व ग्रामस्थांकडून सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. (वार्ताहर)
मांढरदेव घाटात पशुपक्ष्यांसाठी शिवजल योजना
By admin | Published: March 30, 2016 10:20 PM