फलटण : फलटण येथील शिवजीत मुद्रा मल्टिस्टेट को. ऑप. सोसायटीतील ठेवीदारांची ३६ लाख २८ हजार ७८७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रथम वर्ग अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांनी चाैघांना पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा तसेच प्रत्येकी ५० हजारांचा दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.अध्यक्ष मंदाराणी शिवाजी ढमढेरे, उपाध्यक्ष शिवाजी तुकाराम ढमढेरे (रा. पिंपळगाव, ता. दाैंड, जि. पुणे), व्यवस्थापक रंजना रामचंद्र निकम, विक्रम रामचंद्र निकम (रा. भाडळी बुद्रुक, ता. फलटण, जि. सातारा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, फलटण येथे शिवजीत मुद्रा मल्टिस्टेट सोसायटीची शाखा स्थापन करून वरील संशयितांनी बचत ठेव, शेअर्स, पिग्मी, बचत गट, धनवर्षा, लकी ड्राॅ कुपन, एटीएम कार्ड अशा प्रकारच्या सुविधा देऊन ठेवीदारांना आकर्षित केले. मात्र, मुदत पूर्ण झाल्यानंतरही अनेक नागरिक व महिलांचे पैसे परत केले नाहीत. अशा प्रकारे एकूण ३६ लाख २८ हजार ७८७ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात वरील आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक ए. एस. गायकवाड यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान एकूण १८ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने शिवजीत मुद्रा सोसायटीच्या चाैघांना पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.या खटल्यासाठी उपविभागीय अधिकारी राहुल धस, पोलिस निरीक्षक सुनील शेळके, पैरवी अधिकारी सहायक फाैजदार संजय पाटील, अमोल घोरपडे यांनी परिश्रम घेतले. पोलिस प्राॅसिक्युशन स्काॅडचे पोलिस उपनिरीक्षक उदय दळवी, पोलिस उपनिरीक्षक सुनील सावंत, शशिकांत गोळे, हवालदार गजानन फरांदे, अमित भरते यांनी सरकार पक्षाला योग्य ती मदत केली.
Satara: ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना पाच वर्षे शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 12:00 PM