फलटण : शिवराज्याभिषेकदिनी ६ जून रोजी रायगडावर फलटण येथील शिवरुद्रा ढोलताशा पथकाला वाद्य वाजविण्याचा बहुमान मिळाला आहे.
दुर्गराज किल्ले रायगडावर दि. ६ जून रोजी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि लाखोंच्या उपस्थितीत विविध उपक्रमांनी शिवराज्याभिषेक साजरा होत असतो. या ऐतिहासिक कार्यक्रमास महाराष्ट्रातील निवडक ढोलताशा पथकास आमंत्रित केले जाते. या वर्षीचा हा बहुमान सातारा जिल्'ातील फलटण येथील ‘शिवरुद्रा’ या ढोलताशा पथकास मिळाला असून, रायगडावर यंदा होणार फलटणच्या ‘शिवरुद्राचा गजर.’ दुर्गराज किल्ले रायगडावर प्रतिवर्षाप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो.
देशभरातून लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी येथे उपस्थितीत राहतात. यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात हा सोहळा पार पडला जातो. यावर्षी महाराष्ट्रातून तीन विशेष पथकांना महोत्सव समितीने आमंत्रित केले आहे, त्यामध्ये सातारा जिल्'ातील फलटण येथील ‘शिवरुद्रा वाद्य पथक, पुणे येथील ‘रणवाद्य’ पथक आणि नाशिक येथील ‘स'ाद्री गर्जना’ वाद्य पथक या तीन पथकांना रायगडी वादन करण्याचा बहुमान मिळाला आहे. हा कार्यक्रम खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे भोसले यांच्या उपस्थितीत होणार आहे.
निंबुत, ता. बारामती येथील राज्यस्तरीय ढोलताशा पथक स्पर्धांत प्रथम क्रमांक विजेत्या शिवरुद्रा पथकातील युवक-युवतींमध्ये या निमंत्रणाने एक वेगळा उत्साह संचारला आहे. वैशिष्ट्य म्हणजे या पथकात युवतींचा सहभागही मोठ्या प्रमाणात आहे. छत्रपती शिवरायांचा ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक झाला व स्वराज्याला छत्रपती मिळाले. ही घटना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदणारी ठरली. हा दिवस म्हणजे भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन. हा दिवस ‘राष्ट्रीय सण’ म्हणून साजरा होण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती कार्यरत आहे. राज्याभिषेकाच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी समितीतर्फे दुर्गराज रायगडावर राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. यंदाही हा सोहळा ५ व ६ जून रोजी विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. त्यानिमित्त ढोल पथकांना आमंत्रित केले जाते.३० युवक २५ युवतींचा सहभागयंदा ही संधी फलटणच्या ‘शिवरुद्रा’ ढोल पथकास मिळाल्याने फलटणकरांनी शिवरुद्रा पथकातील युवक-युवतींचे कौतुक केले. हे पथक रायगडावर फलटण येथील गजानन चौक येथून रवाना झाले. या पथकात ३० युवक व २५ युवतींचा सहभाग आहे.