सातारा - पावसाळ्यात नद्यांना महापूर आल्यानंतर अनेक गावे संपर्कहीन होतात. त्याचप्रमाणे बामणोली परिसरातील शिवसागर जलाशयातील पाणी कमी होत असल्याने तेथील गावे संपर्कहीन होण्याच्या मार्गावर आहेत. पाणी कमी झाल्याने बोटी काही अंतर जाऊन नांगर टाकत आहेत, त्यामुळे ग्रामस्थांना गावी पोहोचण्यासाठी तासन्तास पायपीट करावी लागत आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिमकडील विशेषत: कोयना शिवसागर जलाशयापलीकडील काठावरील व डोंगरातील गावांना आजही पावसाळ्यात जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवावा लागतो. कोयना धरणाची निर्मिती होण्यापूर्वी नदी पलीकडील गावांना खूप सावधपणे राहावे लागायचे. पावसाळा सुरू झाल्यानंतर नदीतून प्रवास करता येत नव्हता. नदीवर पूल किंवा नदी ओलांडण्याचे कोणतेही सुरक्षित साधन नव्हते. आजही तशीच परिस्थिती थोड्या फार फरकाने जाणवते.
यंदा शिवसागर जलाशयाचे पाणी खूप कमी झाले आहे. त्यामुळे नदीपलीकडील अनेक गावांना लाँचमधून उतरून आपल्या गावापर्यंत जाण्यासाठी तासन्तास चालत जावे लागत आहे. शिरणार, दाभे, खरोसी, गोगवे उचाट, शिंदी, वलवण, झाडाणी, दोडाणी, वाघावळे, कांदा टबन आदी अनेक गावांना व मुºयावरील सर्व गावांना लाँचमधून उतरून तासन्तास पायी प्रवास करावा लागत आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या प्रवासी लाँचने प्रवास करावा लागतो. त्यामुळे पावसाळ्यासाठी सहा महिने पुरतील एवढे आवश्यक साहित्य डोक्यावरून वाहून न्यावा लागतो.
सारा संसार डोक्यावर..
एकदा पाऊस सुरू झाला व नदी वाहू लागली की सर्व मार्ग बंद होतात. म्हणून हे लोक सातारा, बामणोली व तापोळा येथून लाँचने सर्व साहित्य आपल्या घरापर्यंत नेण्याच्या धावपळीत आहेत. मीठ, कांदे, साखर, डाळी, मसाला या वस्तूंचा साठा करावा लागत आहे. वादळी पाऊस सुरू झाल्यावर लाँच तसेच सर्व सेवा ठप्प होतात. हा सर्वांचा अनुभव आहे.
मी शेलटी मु-यावर लहानपणापासून राहतो. पावसाळा सुरू झाल्यावर पुन्हा बामणोली व तापोळ्याला जाता येईल याची खात्री नाही. त्यामुळे पावसाळ्यातील सर्व धान्य व गरजेचे साहित्य अगदी कपडे व पैसे सुद्धा जमवून ठेवले आहेत.
- बाबूराव झोरे, शेलटी मु-हा