किडगाव : ‘शिवसमर्थ कोरोना केअर सेंटर रुग्णांसाठी आधारवड ठरले आहे. कोरोना काळात अथक काम करणाऱ्या आशा सेविकांचा झालेला गौरव हा त्यांच्या कार्याचा उचित सन्मान आहे,’ असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी काढले.
पानमळेवाडी येथील शिवसमर्थ कोरोना केअर सेंटरमध्ये आशा वर्कर आणि कोरोना योद्ध्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष व श्वास मल्टिस्टेट हॉस्पिटल साताराचे प्रवीण पाटील, प्राचार्य करीम शेख, प्रेरणा फाउंडेशनचे चंदन जाधव, टॉप गिअरचे शशिकांत पवार, पंचायत समितीच्या माजी सदस्य कविता मेणकर उपस्थित होते.
गौडा म्हणाले, ‘पानमळेवाडी विभागातील कोरोना बाधित रुग्णांसाठी हे कोरोना सेंटर नक्कीच दिशादर्शक ठरेल. यामुळे अनेक लोकांचे जीव वाचले असून सरिता इंदलकर यांचे काम वाखाणण्याजोगे आहे.’
हेमंत तुपे म्हणाले, ‘इंदलकर दांपत्याच्या विशेष प्रयत्नातून व लोकसहभागातून सुसज्ज असे कोरोना सेंटर उभे राहिले आहे. यामुळे जवळपास ११० रुग्णांना उपचार मिळालेले आहेत. याठिकाणी आशाताईंचा सत्कार केल्याने त्यांना पुढे काम करण्याचे बळ येईल.’
सरिता इंदलकर म्हणाल्या, ‘शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसमर्थ परिवाराच्या सहकार्यामुळे आपण हे काम करू शकलो. या परिसरातील लोकांची साथ मिळाल्याने आपल्याला हे काम करण्याची संधी मिळाली. आशाताईंचा आणि कोरोना योद्ध्यांचा सन्मान केल्याने निश्चितच पुढे त्यांना काम करण्यास बळ मिळेल.’
शिव समर्थ हॉस्पिटलसाठी हनुमंत पवार व शैलेश वैश्य मेडिकल हेल्थ प्लस प्रभादेवी मुंबई यांच्यावतीने सातारा तालुक्यातील शिव समर्थ कोरोना सेंटरसाठी एक लाख रुपयांची औषधे देण्यात आली.
यावेळी सरपंच विनोद शिंदे, रूपाली कांबळे, डॉ. अलिफ इनामदार, डॉ. अंबाजी राजमाने, राजेंद्र तपसे, नवनाथ ननावरे, अमोल गोगावले, हणमंत जगताप, विशाल ननवरे, मंगेश पाटील, जहीर फारस, उपसरपंच राहुल काळे उपस्थित होते.