उंब्रज ( सातारा ) : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर 'बोरिवली-कराड' या शिवशाही बसचा अपघात झाला आहे. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस उपमार्गावर येऊन उलटली. या अपघातात 7 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलीस व महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना तातडीने कराडमधील कृष्णा रुग्णालयात दाखल केले.
बुधवारी (9 मे) सकाळी शिवशाही ( एमए।-४७ वाय/२४५८ ) बस भरधाव वेगाने सातारा ते कराड लेनवरून निघाली होती. वराडे गावाच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचा ताबा सुटला. बस महामार्गावरून उपमार्गावर येऊन उलटली. या अपघातात बसमधील 7 प्रवासी गंभीर जखमी झालेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाने शिवशाही बस सुरू केली आहे. खासगी कंपनीच्या जुन्या ट्रॅव्हल्स गाड्या शिवशाही ताफ्यात दाखल झाल्या असून गेल्या आठवड्यामध्ये मराठवाड्यातही अशाच बसला अपघात झाला होता. त्यामुळे या बसच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा साशंकता निर्माण झाली आहे.