सातारा : साताऱ्यातील पसरणी घाटात सोमवारी शिवशाही बस आणि ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. या अपघातात 50 प्रवासी जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पसरणी घाटात शिवशाही बस आणि खाजगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. यात 50 प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून जखमींना पांचगणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसेच, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
दरम्यान, प्रवाशांना अधिक आरामदायी सेवा मिळावी यासाठी एसटी महामंडळाने अडीच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या शिवशाही बस अपघातांची मालिका थांबता थांबत नाही. गेल्या सव्वा दोन वर्षांतील राज्यातील अपघातांचा आकडा ५५० वर गेला आहे. याचा अर्थ बसचे दररोज एक ते दोन अपघात होत असल्याने ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेशी तर तडजोड केली जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार १ जून २०१७ ते २५ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत शिवशाहीचे राज्यभरात ५५० लहान-मोठे अपघात झाले आहेत. यामध्ये प्राणांतिक अपघातांची संख्या ५१ वर पोहचली असून, ३७१ गंभीर तर ११५ किरकोळ स्वरूपाचे अपघात आहेत. एप्रिल २०१८ ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान एकूण ४४२ अपघात झाले असून ४४ प्राणांतिक व ३०० गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत.
अपघातांच्या एकूण संख्येचा विचार केल्यास ही सेवा सुरू झाल्यापासून दररोज सरासरी एक ते दोन अपघात झाले आहेत. शिवशाहीच्या अपघातांचा मुद्दा विधानसभेतही गाजला होता. त्यानंतर एसटी महामंडळाकडून विविध उपाययोजना केल्या. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा एसटी महामंडळाकडून केला होता. पण हा दावा फोल ठरला आहे.