कऱ्हाड : कऱ्हाड येथे शिवजयंतीच्या अनुषंगाने आकर्षक सजावटींसह देखावे उभारण्यात आलेले आहेत. शहरातील दत्त चौकापासून ते पांढरीच्या मारूती मंदिरापर्यंत बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर भगव्या रंगाच्या झालरींचे झेंडे लावण्यात आले आहेत. शहरात अनेक मंडळांनी गडकोट किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारलेल्या आहेत. तर काही मंडळांनी आकर्षक रांगोळ्यांचा सडा रस्त्यावर काढला आहे. कऱ्हाडला दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दरवर्षी शहरातील अनेक सार्वजनिक मंडळे या शिवजयंतीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. आकर्षक देखाव्यांसह विद्युत रोषणाई करून सजावटीतून चौकाचौकात शिवमूर्तींची प्रतिष्ठापना करतात. यावर्षीही शहरातील अनेक मंडळांनी शिवजयंतीनिमित्त आकर्षक सजावटी केल्या आहेत.शहरातील पाटणकर कॉलनी येथील चौकात शिवाजी गणेश क्रीडा मंडळ, साईदत्त नवरात्र उत्सव मंडळाने किल्याची प्रतिमा उभारली आहे. तर शनिवार पेठेतील मंडळाने सूर्याची आकर्षक प्रतिमा व त्यावर विद्युत रोषणाई केली आहे. गुरूवार पेठेतील सात शहिद चौकातील आदिमाया मंडळाच्या वतीने रायगड किल्ल्याची प्रतिमा उभारली असून आकर्षक सजावट केली आहे. अशाप्रकारे मुख्य बाजारपेठेतील नवकला गणेश व नवरात्र उत्सव मंडळ, सोमवार पेठेतील स्वराज्य गणेश व नवरात्र उत्सव मंडळ, गुरूवार पेठेतील कमानी मारूती मंडळाच्या वतीने आकर्षक फुलांच्या सजावटी, गुरूवारी पेठेतील मुख्य रस्त्यावर भगवा रक्षक मंडळ यांनी फुलांची आकर्षक सजावट केली आहे. तर गुरूवार पेठतील नागोबा चौकात आकर्षक दरबाराची प्रतिकृतीही उभारण्यात आलेली आहे.सोमवार पेठेतील पावसकर गल्लीतील श्रीकृष्ण गजानन मंडळ, राधा महिला मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. मंगळवार पेठतील जोतिर्लिंग गणेश मंडळाच्या वतीने नागोबा चौकात भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. अशा प्रकारे कऱ्हाड शहर हे शिवमय झाले असून शहरात चौकाचौकांत शिवसृष्टी उभी राहिली आहे. (प्रतिनिधी)स्वागतासाठी हत्ती अन् आकर्षक रांगोळी...शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक मंडळांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त करण्यात आलेल्या सजावटीत हत्ती, मावळे यांची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. तसेच आकर्षक रांगोळीही काढण्यात आल्याने पाहण्यासाठी नागरिकांकडून गर्दी केली जात आहे. दत्तचौकात आकर्षक सजावटशिवजयंतीनिमित्त कऱ्हाड येथील मुख्य चौक असलेल्या दत्तचौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळासमोर आकर्षक सजावट करण्यात येत आहे. कऱ्हाड येथे शिवजयंतीनिमित्त दत्तचौकात तयार करण्यात येणारी सजावट ही शिवजयंतीचे विशेष आकर्षण ठरत असते. आज निघणार दरबार मिरवणूक हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने सोमवारी सोमवार पेठ येथून पांढरीचा मारूती मंदिर, मंगळवार पेठ ते दत्त चौक मार्गे भव्य ऐतिहासिक दरबार मिरवणूक काढली जाणार आहेत. शहरासह परिसरातील सार्वजनिक मंडळांकडून मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक देखाव्यांचे चित्ररथ सार्वजनिक मंडळांमार्फत सहभागी केले जाणार आहेत.
कऱ्हाडात साकारली ‘शिवसृष्टी’
By admin | Published: May 08, 2016 8:58 PM