सागर चव्हाणपेट्री : छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास भावी पिढीसमोर उभा असावा, त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी. शिवसृष्टीकडे पाहताना इतिहासाची आठवण जागृत व्हावी यासाठी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित शिवसृष्टी जावळी तालुक्यातील कुसुंबीमुरा प्राथमिक शाळेत साकारली आहेत.
शाळेच्या अभिनव उपक्रमाचे सर्वस्तरातून विशेष कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांसह, पर्यटकांनादेखील छत्रपती शिवरायांचे कार्य, जीवनपटाचा स्वानुभव एका दृष्टीक्षेपात पाहावयास मिळत आहे.आयएसओ मानांकित कुसुंबीमुरा शाळा अनेकविध उपक्रमाद्वारे चर्चेत आहे. शाळेने राबविलेला अभिनव उपक्रम पाहता जिल्हा, राज्यातील प्राथमिक शाळेतील बहुधा पहिलाच उपक्रम आहे. कास पठाराच्या कुशीत वसलेले कुसुंबीमुरा डोंगरमाथ्यावरील दुर्गम गावात कित्येक शतकापासून मोठ्या आकाराचे कातळाचे दगड अधीमधी स्थिरावले आहेत.शालेय आवारात कित्येक वर्षापासून असलेल्या कातळ दगडाचा आपल्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अनुभवात वाढ होण्यासाठी, तसेच मुक्त वातावरणात एका दृष्टीक्षेपात छत्रपती शिवरायांच्या कार्याचा अभ्यास व्हावा यासाठी मोठया दगडाचा वापर करून शिवसृष्टी साकारण्याची संकल्पना शिक्षकांना सूचली. विद्यार्थी, लोकसहभागातून या संकल्पनेला मुर्त स्वरूप आले.कातळाच्या दगडाला विशेष आकार, आकर्षक रंगकाम, रेखीव काम, प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर, विविध माहितीपटादवारे अगदी नगण्य रकमेत शिवसृष्टी साकारण्यात आली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांसह पर्यटनास आलेल्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. प्रत्येकजण हा अपुर्व सोहळा कॅमेऱ्यात टिपत आहे.शिक्षकांची संकल्पना, विद्यार्थी-ग्रामस्थांच्या मदतीने साकारलेल्या शिवसृष्टी कलाकृतीतून संपुर्ण वातावरण प्रसन्न, शिवमय झाले. याचा फायदा विद्यार्थ्याना होत आहे. पर्यटकांकडून कलाकृतीचे कौतुक होत असून छत्रपती शिवरायांचा जन्म, स्वराज्यस्थापना प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, प्रतापगड पराक्रम, शाईस्तेखान फजिती, आग्राहून सुटका, राज्याभिषेक सोहळा, मृत्यु, राजमुद्रा अशाप्रकारे कार्य, जीवनपट माहितीपटाद्वारे एका दृष्टीक्षेपात पाहावयास मिळत आहे. ब्रांझमधील अश्वारूढ शिवरायांची मुर्ती लोकसहभागातुन देण्यात आली.
मुळच्याच कातळाच्या दगडावरील कलाकृतीसाठी वापरलेल्या प्लास्टर ऑफ पॅरीस, रंगकामाचा खर्च शिक्षकांकडून करण्यात आला. शिक्षक, विद्यार्थी, लोकसहभागातून कलाकृती साकारण्यासाठी एक महिना कालावधी लागला. रोपवे, जलतरण कुंड बनविण्याचा मानस आहे. -विनायक चोरट, मुख्याध्यापक
- ब्रांझमध्ये अश्वारूढ शिवरायांची मूर्ती
- साडेआठ फूट लांबी, पाच फूट रुंदी, साडेपाच फूट उंचीच्या कातळ दगडाचा किल्ला
- संपूर्ण शिवसृष्टीभोवती किल्ल्याच्या धर्तीवरची तटबंदी व बुरुजांची रचना
- महाप्रवेशद्वार
- प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये पायऱ्या
- अॅपेक्समध्ये आकर्षक रंगकाम
- जीवनपटावर आधारीत पोस्टर्स/माहितीपट