कऱ्हाड : भारतीय सैन्यदलाच्या विजयाप्रीत्यर्थ कºहाडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या विजय दिवस समारोह सोहळ्यास शुक्रवारी शोभायात्रेने दिमाखदार प्रारंभ झाला. या शोभायात्रेत अनेक चित्ररथ, महापुरुषांचे पेहराव केलेले युवक-युवती, मावळ्यांच्या वेशातील घोडेस्वार आणि शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
भारतीय सैन्यदलाच्या बांगला मुक्ती संग्रामातील देदीप्यमान विजयाप्रीत्यर्थ कºहाडला प्रत्येक वर्षी विजय दिवस साजरा केला जातो. यंदाही छत्रपती शिवाजी स्टेडियमवर विजय दिवस समारोह होत असून, शुक्रवारी शोभायात्रेने या समारोहास प्रारंभ झाला. येथील विजय दिवस चौकातून शोभायात्रेस नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील, डॉ. अशोकराव गुजर, सहायक पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, विष्णू पाटसकर, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, विद्या पावसकर, सलीम मुजावर, कॅप्टन इंद्र्रजित मोहिते यांच्यासह विजय दिवस समितीचे पदाधिकारी, सदस्य यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी पारंपरिक वाद्यांचा गजर करण्यात आला. यंदा शोभायात्रा महात्मा गांधींना समर्पित करण्यात आल्याने शहर व परिसरातील शाळांनी महात्मा गांधींच्या जीवनकार्यावर आधारित चित्ररथ तयार केले होते.
यशवंत हायस्कूल, संत तुकाराम हायस्कूल, हुसेन कासम दानेकरी अँग्लो उर्दू स्कूल, दिगंबर काशिनाथ पालकर शाळा, पालिकेच्या शाळांनी महात्मा गांधींच्या जीवनावरील चित्ररथ तयार केले होते. एंजल्स इंटरनॅशनल स्कूलचे झांजपथक, विविध शाळांचे एनसीसीचे पथक, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, साईबाबा आदींच्या वेशभूषा केलेले कलाकार सहभागी झाले होते. विजय दिवस चौकातून मुख्य रस्त्याने कृष्णा नाकामार्गे कन्या शाळेसमोरून चावडी चौक, तेथून आझाद चौकमार्गे दत्त चौकातून शोभायात्रा बसस्थानकासमोरून पुन्हा विजय दिवस चौकात नेण्यात आली. शोभायात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, शोभायात्रेनंतर लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात आले. संध्या पाटील, नगरसेवक सौरभ पाटील यांच्या हस्ते हा उद्घाटन समारंभ झाला. निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगरसेवक विनायक पावसकर, विजय वाटेगावकर, विद्या पावसकर, अॅड. संभाजीराव मोहिते, अरुणा जाधव, पौर्णिमा जाधव, तळबीडचे सरपंच जयवंतराव मोहिते, रमेश जाधव, विनायक विभूते, चंद्र्रकांत जाधव, अॅड. परवेज सुतार, विलासराव जाधव, रत्नाकर शानभाग, सैन्यदलातील अधिकारी यांच्या उपस्थितीत झाला.शिवरायांच्या काळातील साडेतीनशे शस्त्रप्रदर्शनात पुणे येथील शंभूराजे मैदानी खेळ विकास मंचच्या वतीने शिवाजी महाराजांच्या काळातील समकालीन सुमारे ३५० शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. कट्यार, ढाल, कोयता, भाले, तलवार, तोफा, बिछवा, वाघनखे आदींसह अन्य शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. शस्त्र प्रदर्शनात छोट्या तोफा, रडार, बंदूक यासह अन्य शस्त्रे ठेवण्यात आली आहेत.कऱ्हाड येथे आयोजित विजय दिवस समारोहाला शुक्रवारी शोभायात्रेने थाटात प्रारंभ झाला.