दत्ता यादव
सातारा : वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा ही मानसिकता एकविसाव्या शतकात किंचितही कमी झाली नाही. यामुळे आजही मुलींची गर्भातच हत्या केली जाते. याचे भयानक वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले. फलटण शहरापासून जवळच असलेल्या पिंप्रद या गावाजवळील एका शेतात असलेल्या घरामध्ये गर्भलिंग निदान चाचणी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
असा उघड झाला प्रकार
फलटण शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंप्रद या गावाजवळ गर्भलिंग निदान चाचणी केली जात असल्याचे समजल्यानंतर ‘लोकमत’चे प्रस्तुत प्रतिनिधी तिथे पोहोचले. त्या ठिकाणी जाण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला असलेल्या हाॅटेल मालकाकडे गर्भलिंग निदान कुठे केली जाते, याची चौकशी केली. त्याने घाबरत घाबरत माहिती देऊन तुम्ही एकटेच जा. डाॅक्टरांना फोन करून आलात का, रिझल्ट शंभर टक्के आहे. असं सांगून तो कामात व्यग्र झाला.
...म्हणे, अपॉइंटमेंट घेतली का?
nतेथून सुमारे एक किलोमीटरवर एक घर आहे. तेथे जाऊन घरातील महिलेला डाॅक्टरांनी बोलवलंय, असं सांगितलं. तेव्हा तिने तिच्या पतीला फोन करून तातडीने बोलावून घेतले.
पती दुचाकीवरून उसातून कुठून तरी आला. बसा, सरांनी तुम्हाला यायला सांगितलंय ना. असं चालत चालत बोलत तो कावरा बावरा झाला.
nहो डाॅक्टरांशी बोलणं झालंय, असं सांगताच त्याने घरात जाऊन जिथं गर्भलिंगनिदान केलं जातं. त्या खोलीचं लाॅक उघडलं. बसा इथे असं म्हणताच त्याच्या मोबाइलवर डाॅक्टरांचा फोन आला.
अपाॅइंटमेंट घेतल्याशिवाय इथे कोणीही येत नाही. तुम्ही येथे आलाच कसे, अशी डाॅक्टर विचारणा करत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने डाॅक्टरांचा फोन थेट प्रस्तुत प्रतिनिधीलाच दिला.
...अन् डॉक्टर झाले नॉट रिचेबल
डाॅक्टरांनी कोण, कुठले, कसे आलात, अशी विचारणा केल्यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीने डाॅक्टरांना आठवड्याभरापूर्वी या ठिकाणी आलेल्या महिलेचे नाव सांगितलं. तेव्हा डाॅक्टर चपापले. हो तुमचं बरोबर आहे. पण, त्या महिलेनं मला सांगितलं नाही. त्यांचा फोन आला की या. असं म्हणून डाॅक्टर नाॅटरिचेबल झाले.
गर्भवती महिलांना नेण्यासाठी चार कार
गर्भवती महिलांना नेण्यासाठी या ठिकाणी चार कार आहेत. साेबत आलेल्या नातेवाइकांना त्या ठिकाणी नेलं जात नाही. केवळ एकट्या महिलेलाच नेलं जातं. दहा मिनिटांत गर्भलिंग निदान चाचणी करून मुलगा की मुलगी हे सांगितलं जातं. गाडीतून मोबाइल नेण्यास मनाई केली जाते.
ओळखीच्यांकडून १६ हजार
गर्भलिंगनिदानापूर्वी महिलेकडून त्यांच्या गाडीतच पैसे घेतले जातात. ओळखीचा असेल तर १६ हजार आणि इतरांकडून ४० ते ६० हजार रुपये घेतले जातात.