सातारा : मंडई, बॅँका, शासकीय कार्यालय चालू आहेत. तेथे कोरोना होत नाही का? केवळ दुकानदार, हातगाडीधारकांवर अन्याय करू नका, असा इशारा देत प्रशासनाने संचारबंदीचे निर्बंध तातडीने शिथिल करावे, अशी मागणी कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांनी केली.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा संचारबंदीचे निर्बंध कठोर केले आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. प्रशासनाच्या या निर्णयास जिल्ह्यासह साताऱ्यातील व्यापाऱ्यांकडून विरोध दर्शविण्यात आला. तसेच मंगळवारी सकाळी साताऱ्यात व्यापाऱ्यांकडून मूक आंदोलनही करण्यात आले. राजवाडा, पोवई नाका येथे आंदोलक आपापल्या दुकानांच्या बाहेर कुटुंबासह हातात मागण्यांचे फलक घेऊन उभे होते. या आंदोलनाला वेदांतिकाराजे भोसले यांनी पाठिंबा दर्शविला.
वेदांतिकाराजे म्हणाल्या, कोरोनामुळे संचारबंदीचे केव्हाही लागू केली जात आहे व केव्हाही शिथिल केली जात आहे. कोरोना हा केवळ साताऱ्यातच आहे का, उत्तर प्रदेश, गुजरात येथे लोकसंख्या मोठी आहे. तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव झाला; परंतु टाळेबंदी अल्प प्रमाणात होती. आपल्याकडे दोन ते तीन महिने टाळेबंदी केली जात आहे. यामुळे लोकांनी जगायचे कसे? हा प्रश्न उपस्थित होत आहे. पैसे नसल्याने लोक हतबल होऊ लागले आहेत. आत्महत्या वाढू लागल्या आहेत.
कृष्णा कारखान्याची निवडणूक झाली. त्या वेळेस सभा झाल्या. तेव्हा कोरोना नव्हता का. कोरोनाच्या दुसरा टप्प्यात निवडणूक झाली तेव्हा प्रशासन का करीत होते. सरसकट बंद ठेवणे योग्य नाही. मंडई, बॅँका, शासकीय कार्यालय चालू आहेत. तेथे कोविड होत नाही का? केवळ दुकानदार, हातगाडीधारकांवर अन्याय करु नका. प्रशासनाने तातडीने संचारबंदीचे निर्बंध शिथिल करून व्यापारीवर्गास दिलासा द्यावा.
फोटो : ०६ सातारा आंदोलन
संचारबंदीचे निर्बंध शिथिल करावे या मागणीसाठी मंगळवारी साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी हातात फलक घेऊन मूक आंदोलन केले. (छाया : जावेद खान)