सातारा: इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधिताची संख्या कमी येत असतानाच सातारा मात्र याला अपवाद ठरत आहे. याची कारणे अनेक असली तरी रस्त्यावर विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांना अद्यापही जरब बसलेली दिसत नाही. ज्याप्रमाणे पहिल्या दिवशी जेव्हा साताऱ्यात लॉकडाऊन जाहीर झाला, तेव्हा १०० हून अधिकजणांवर गुन्हे दाखल केले गेले. मात्र, आता गुन्हे दाखल होणाऱ्यांची संख्या कमी झाली, पण बाहेर पडणाऱ्यांची संख्या मात्र तितकीच असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाने सर्व व्यवसाय ठप्प केले असले तरी कोरोनाची साखळी तोडणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. केवळ पोलिसांनी कारवाया केल्यानंतरच घरात थांबावे, अशाने कोरोनाची साखळी तुटणार नाही, तर दुसरीकडे पोलिसांनीही आता कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. अनेकजण सध्या खोटी कारणे सांगून घराबाहेर पडत आहेत. या कोरोना स्प्रेडर लोकांवर खरंतर जरब असणे गरजेचे आहे. सातारा शहरांमध्ये सकाळी सात ते अकरा या वेळेत घरपोच भाजीपाला आणि किराणा मालाची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, असे असताना अनेक दुकानदार दुकानाचे शटर अर्धे उघडे ठेवून विक्री करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हीच परिस्थिती भाजीपाला विक्रेत्यांचीही आहे. लोक खरेदीच्या निमित्ताने घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग फैलावत आहे. सकाळी दहा ते अकरा या वेळेतच पोलिसांच्या कारवाया होत आहेत. मात्र, दुपारी बारानंतर पोलीस रस्त्यावर दिसत नाहीत. याचाच अनेकजण गैरफायदा घेऊन काहीही काम नसताना इकडून तिकडे फिरत आहेत. काहीजण घरातून जुनी मेडिकलची फाईल घेऊन घराबाहेर पडत आहेत. पोलिसांनी विचारल्यानंतर त्यांना हातात असलेली फाईल दाखवून आपली सुटका करून घेत आहेत. पुढे गेल्यानंतर पोलिसांना कसे गंडवले अशा तोऱ्यात अनेकजण शहरात मोकाट फिरत आहेत. या कोरोना स्प्रेडरवर खरंतर पोलिसांनी अत्यंत कडक धोरण अवलंबून कारवायांना वेग आणला पाहिजे.
चौकट : अनेकजण काढतायेत अंगावर आजार!
खोकला, सर्दी, ताप अशी लक्षणे असतानाही अनेकजण आजार अंगावर काढतात. प्रकृती खालावल्यानंतर अचानक मग रुग्णालयात धाव घेत आहेत. तोपर्यंत हा रुग्ण दहा ते बाराजणांना संसर्ग करून मोकळा झालेला असतो. त्यामुळे थोडी तरी लक्षणे आढळली तर आजार अंगावर न काढता तत्काळ रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे, तरच ही कोरोनाची लाट रोखू शकते.
चौकट : घरपोच सुविधा नावालाच!
शहरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक दुकाने उघडी असतात. हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे लोक खरेदीच्या निमित्ताने घराबाहेर पडत आहेत. दुकानदारांना घरपोच सुविधा देणे परवडत नाही. त्यांच्या दुकानांमध्ये कामगारही नाहीत. त्यामुळे मग अनेक दुकानदार आपल्या दुकानाचे अर्धी शटर उडून गिऱ्हाईकांची वाट पाहत असतात.