रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील अत्यावश्यक सेवेतील बहुतांशी दुकाने सोशल मीडियावरील अफवेमुळे अकरा वाजताच बंद करण्यात आली हाेती. याबाबत सकाळपासूनच व्यापाऱ्यांच्यात याबाबतच्या चर्चेने गोंधळ सुरू होता.
याबाबत माहिती अशी की, सोशल मीडियावर सोमवारी मध्यरात्रीपासून नवीन नियमावली शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वेळेच्या निर्बंधासह सुरू असलेली अत्यावश्यक दुकाने आता सकाळी सात ते अकरा या वेळेतच चार तास सुरू ठेवायची आहेत. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अशा आशयाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट विविध पोस्ट अनेकांनी स्टेटसला ठेवलेल्या आहेत. यामुळे व्यापाऱ्यांचा गोंधळ उडाला होता. सकाळपासूनच अनेक व्यापारी एकमेकांना दूरध्वनीवरून चर्चा करून वेळेच्या बंधनाबाबतची खातरजमा करून घेत होते. मात्र सोशल मीडियाचा एवढा चुकीचा परिणाम झाला की, नव्व्याण्णव टक्के व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांचे शटर अकरा वाजताच डाऊन केले होते. त्यामुळे रहिमतपुरातील रस्ते पूर्णतः ओस पडले होते.
नगरपालिकेने गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक दुकानांवर दंडात्मक कारवाई केली होती, तर काही दुकानांना सील ठोकले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पालिकेच्या कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी कुठलीही खातरजमा न करता थेट दुकानांचे शटर बंद केल्याची चर्चा आहे. तर काही व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यात व नगरपालिकेमध्ये दूरध्वनीवरून विचारणा करून सोशल मीडियावरील अफवा असल्याचे जाणले. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सायंकाळी सहापर्यंत सुरू ठेवली होती.
फोटो मेलवर आहे.
रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील व्यापाऱ्यांनी किराणा दुकाने बंद ठेवल्याने रस्ते ओस पडले होते. (छाया : जयदीप जाधव)