मायणी : हिवरवाडी (ता.खटाव) येथील देशमुख मळ्यातील अजित देशमुख यांच्या अडीच एकर क्षेत्रातील आंबा बागेला पवनचक्कीच्या डीपीत झालेल्या शॉर्टसर्किटमुळे साठ आंब्याची झाडे जळाली. त्यामुळे सुमारेे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत आंबा बागायतदार हिंदुराव जगताप यांच्याकडून मिळालेली अधिक माहिती की, सन २००५ मध्ये आमचा मुलगा अजित जगताप याने सुमारे अडीच एकर क्षेत्रामध्ये केशर, हापूस व बदाम अशा विविध जातींच्या आंब्याची सुमारे १५० झाडांची लागण केली होती. सुमारे पंधरा वर्षांपूर्वीची ही आंब्याची झाडे असून, गतवर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व सर्वत्र लाॅकडाऊन असतानाही आम्हाला आठ ते दहा लाख रुपये या आंब्याच्या झाडापासून उत्पन्न मिळाले होते.
पुढील महिन्यांमध्ये हा आंबा विक्रीयोग्य होणार होता. त्यातच परवा शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास येथील बागेच्या वरील बाजूस असलेल्या पवनचक्कीच्या डीपीमध्ये शॉर्टसर्किटने आग लागून संपूर्ण डीपी जळाला, तसेच डीपी जळत असताना डीपीच्या शेजारील वाळलेल्या गवताने पडून गवताने पेट घेतला व मोठ्या प्रमाणात आग लागल्याने, ती आग बागेच्या दिशेने आली आणि बागेतील गवताने पेट घेतला.
बागेतील झाडांना आग लागल्याचे पाहून त्यांनी आरडाओरडा केला व आसपासच्या लोकांना बोलावून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, केशर, बदाम, हापूस आंब्याची बागेतील साठ झाडे जळून खाक झाली आहेत, तर आंब्याची ९० झाडे वाचविण्यात यश आले. जळीत झाडांची कृषी अधिकारी एस.व्ही. जगताप, तलाठी जी. एन. पिसे, सरपंच सविता जगदाळ, पोलीस पाटील ज्योती माने, किरण देशमुख व कार्यालयातील अधिकारी यांनी पंचनामा केला असल्याचेही जगताप यांनी सांगितले.
(चौकट)
नुकसान भरपाईची मागणी
२००५ पासून अतिशय कष्टाने आंब्याची बाग उभा केली आहे. दुष्काळात प्रत्येक वेळी विकत पाणी घेऊन ती आंब्याची बाग जगविण्यासाठी आम्ही धडपड केली. बागेतील साठ झाडे जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने योग्य ती कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी.
- जयहिंद जगताप, आंबा बागायतदार, हिवरवाडी
०६मायणी
हिवरवाडी येथील जळालेल्या आंब्याच्या बागेचा पंचनामा करताना, कृषी अधिकारी एस.व्ही. जगताप, तलाठी, सरपंच, पोलीस पाटील उपस्थित होते. (छाया : संदीप कुंभार)