सातारा : कोविडमुक्त झाल्यानंतर अनियंत्रित मधुमेह व स्टेरॉइडचा अधिक डोस घेणाऱ्यांमध्ये सध्या म्युकरमायकोसिस अर्थातच काळी बुरशी होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. साताऱ्यातील हा आकडा १२च्या पुढे गेला आहे. यावर उपचार असणारे ‘पॉसॅकोनाझोल’ या गोळ्या आणि ‘लिपोसोमल एम्फोटिसिरीन बी’ या इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे त्याच्या शोधार्थ नातेवाइकांना मुंबईची वारी करावी लागत आहे.
कोरोना विषाणूवर यशस्वी उपचारानंतर ‘म्युकरमायकोसिस’सारख्या आजाराची गुंतागुंत वाढत असल्याने आरोग्य क्षेत्रात चिंता वाढली आहे. यावर औषधे, शस्त्रक्रिया आणि मधुमेहासारख्या मूलभूत जोखीम घटकांचे त्वरित नियंत्रण करणे गरजेचे आहे. सातारा जिल्ह्यात मार्चपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू झाला होता. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक तीव्र असल्याची आणि यात मृत्यूचे प्रमाण वाढल्याने सातारकर चिंतित असतानाच या काळ्या बुरशीने सर्वांचीच पाचावर धारण बसवली आहे.
म्युकरमायकोसिसची औषधे आणि इंजेक्शन साताऱ्या उपलब्ध नसल्याने ते आणण्यासाठी नातेवाइकांना मुंबईला जावं लागत आहे. अतिरिक्त पैसे मोजण्याची तयारी दाखवूनही औषधे मिळत नसल्याने रुग्णावर उपचार करायचे कसे? असा प्रश्न पडला आहे. रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने या औषधांचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे येथील औषधविक्रेत्यांनी सांगितले. कोरोनाच्या संकट काळात या आजाराची भर पडल्याने नातवाइकांची चिंता वाढली आहे.
पॉइंटर
जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे संशयित रुग्ण : १२
पूर्वी वर्षाला लागणारे इंजेक्शन : २०
इंजेक्शनची सध्या रोजची मागणी : ४०
चौकट :
मागणी किती, पुरवठा किती?
जिल्ह्यात पूर्वी वर्षातून बोटावर मोजण्या इतपत रुग्ण आढळत असल्याने त्यांच्या उपचारासाठी आवश्यक असणारे इंजेक्शनही कमी लागायचे. वर्षभरात २० इंजेक्शनची गरज जिल्ह्याची होती. कोविड पश्चात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असल्याने आता रोज सुमारे ४० इंजेक्शनची आवश्यकता आहे.
एका रुग्णाला लागतात ६० डोस
म्युकरमायकोसिस हा सहा आठवड्यांत बरा होणारा आजार आहे. सलग दहा दिवस रोज १० इंजेक्शन द्यावी लागतात. यातील काही इंजेक्शन १७०० रुपयांचे, तर काही ७००० रुपयांची आहेत. इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे सध्या त्याचा काळाबाजारही होत असल्याचे आढळून येते. निव्वळ इंजेक्शन आणि गोळ्यांचाच एकूण खर्च दोन लाखांच्या पुढे जातो.
ओठ, नाक, जबड्याला बसतो फटका
स्टेरॉइडचा अतिवापर, अधिक काळ आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्यांना म्युकरमायकोसिस होणं स्वाभाविक आहे. कोरोनातून बरे झालेल्या तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांना या आजाराची लागण होते. याचा शिरकाव हा नाकावाटे होत असून, सायनस होऊन पुढे डोळ्यांत आणि मेंदूपर्यंत पोहोचतो. यामुळे बऱ्याचदा जबडा आणि डोळासुद्धा काढावा लागतो.
औषधांचा तुटवडा नातेवाइकांची डोकेदुखी
कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वीपर्यंत या बुरशीच्या रुग्णांची संख्या नियंत्रित होती. एम्फोटिसिरीन बी या इंजेक्शनची वर्षाची मागणी आता दिवसाचा होऊ लागली आहे. इंजेक्शनच नव्हे तर टॅबलेटसुद्धा उपलब्ध होत नसल्याने नातेवाईक अक्षरश: रडकुंडीला आले आहेत. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांची मागणी कंपनीकडे करण्यात आली आहे, मात्र पुरवठा अद्यापही झाला नसल्याची माहिती मेडिकल असोसिएशनचे प्रवीण पाटील यांनी दिली.
कोट :
काय म्हणतात तज्ज्ञ
१. कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण सातारा जिल्ह्यात नव्हता. दुसऱ्या लाटेत मात्र याचे रुग्ण वाढलेले दिसत आहेत. रोज एखादा रुग्ण तरी बाधित निघतोय. पूर्वी वर्षातून दोन-तीन रुग्ण आणि दिवसाला एक दोन रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे रुग्णांनी लक्षणे दिसताच वेळीच काळजी घेत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. संदीप आठल्ये, कान, नाक, घसा तज्ज्ञ
२. मागील काही वर्षांत म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण आढळला नाही. मागील महिन्याभरापासून या आजाराची लक्षणे असणाऱ्या रुग्णांचा सामना होत आहे. कोविडमुक्त झाल्यानंतर डोळ्यातून पाणी येतं म्हणून रुग्ण तपासणीला येतात. हा आजार नाकावाटे डोळ्यापर्यंत शिरकाव करतो. त्यामुळे रुग्णांनी वेळीच काळजी घेण्याची गरज आहे.
- डॉ. श्रीराम भाकरे, नेत्ररोगतज्ज्ञ
३. रोगप्रतिकारशक्ती कमी असणाºया आणि मुधमेह असणाऱ्या रुग्णांमध्ये या आजाराचा सर्वाधिक धोका आहे. कोविड उपचारात स्टेरॉइडचा अतिवापर आणि आयसीयूमध्ये प्रदीर्घ उपचार ही दोन कारणंही याला कारणीभूत आहेत. वेळेत लक्षात आलं तर सहा आठवड्यांत हा आजार बरा होतो. विलंब झाला तर मात्र अवयव काढणं किंवा जिवघेणाही ठरतो.
- डॉ. चंद्रशेखर घोरपडे, दंतचिकित्सक