सातारा : अनेक वाहनचालक शाॅर्टकट जाण्यासाठी राँगसाईडने प्रवास करत आहेत. हे स्वत:च्या आणि इतरांच्या जीवितास धोका असतानाही अनेक जण वाहतूक नियमांचे उल्लंघन करत आहेत.
शहरात सध्या वन वे नसला तरी काही ठिकाणी नो-एंट्री झोन आहेत. या ठिकाणी अनेक वाहनचालक नियम तोडून राँगसाईडने शाॅर्टकट मारत आहेत. जर त्या ठिकाणी पोलीस असले तर नक्कीच वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, पोलीस नसले की वाहनचालकांचे चांगलेच फावते.
मोती चौक
तांदूळ आळीतून अनेक जण राँगसाईडने मोती चाैकात येतात. अशा वेळी पोवई नाक्यावरून एखादे वाहन वेगात आले तर अपघात होऊ शकतो.
पोवई नाका
पोवई नाक्यावरून विरुद्ध दिशेने अनेक जण येतात. या वेळी अनेकदा या ठिकाणी अपघात झाले आहेत. मात्र, तरीसुद्धा वाहनचालक सुधारत नाही.
बसस्थानक
बसस्थानकासमोर नेहमीच वर्दळ असते. इथेही मंडईतून येणारे विरुद्ध दिशेने येतात. त्यामुळे या ठिकाणीही अनेक अपघात झाले आहेत.
गोडोली चाैक
गोडोली चाैकामध्येही राँगसाईडने येणारी वाहने अनेक आहेत. इथे पोलीस नसल्यामुळे वाहनचालक बिनधास्त आहेत.
विसावा नाका
बाॅम्बे रेस्टाॅरंट चाैकातून साताऱ्यात वाहनचालक येत असतात. परंतु काही वाहन चालक विरुद्ध दिशने बाॅम्बे रेस्टाॅरंट चाैकात जातात.
झेडपी चाैक
झेडपी चाैकामध्येही अनेकदा अपघात झाले आहेत. कोण कुठल्या दिशेने येते, हे समजत नाही. परंतु इथे पोलीस असतात. इतकीच जमेची बाजू
भूविकास बँक चाैक
या चाैकामध्ये रात्रीच्या सुमारास अपघातात होतात. अनेक दुचाकीस्वार शाॅर्टकट मारतात. त्यामुळे इथे सातत्याने अपघात होत आहेत.
करंजे नाका
करंजे नाक्यावरही अपघात होतात. इथे तिन्ही बाजूने रस्ते असल्यामुळे वाहनचालक राँगसाईडने येतात. त्यामुळे मग अपघात होतात.
पाचशे एक पाटी
शहरातील पाचशे एक पाटीजवळ नो-एंट्री असतानाही वाहनचालक शाॅर्टकट मारतात. इथं अपघात होत नाहीत; पण कारवाई होते.
राँग साईड : वर्षभरात जमा
झाला ८० हजारांचा दंड
nशहरात राँगसाईडने येणारे वाहन सर्वाधिक आहेत. या वाहनचालकांकडून वर्षभरात सुमारे ८० हजार दंड वसूल करण्यात आला आहे.
nसर्वाधिक दंड हा मोती चाैक, पाचशे एक पाटी, पोवई नाका या ठिकाणी आकारण्यात आला आहे.
nकोरोनामुळे अनेकदा लाॅकडाऊन होते. त्यामुळे यंदा फारसा दंड आकारण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहरात अनेक वाहनचालक नो-एंट्रीतून येतात. अशा वेळी वाहतूक पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते. अनेकदा वाहनचालकांना तोंडी सूचनाही दिल्या जातात. त्या वेळी काही वाहनचालक पोलिसांचे ऐकतात; पण जे एेकत नाहीत, नियम तोडतात, त्यांच्यावर दोनशे रुपये दंड आकारण्यात येतो.
- -विठ्ठल शेलार, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा