ढेबेवाडी : ‘सर्वसामान्य जनतेचा आर्थिक कणा असलेली सहकार चळवळ उद्ध्वस्त करणाऱ्या व्यापारधार्जिण्या सरकारला शेतकऱ्यांचा हिसका दाखवा, असे सांगतानाच सातारा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा. संपूर्ण राज्य राष्ट्रवादीमय करण्याचा प्रयत्न करा,’ असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचे रणशिंग फुंकले.ढेबेवाडी, ता. पाटण येथे सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व विविध संस्थांसह राज्य माथाडी कामगार युनियनच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा तसेच आमदार नरेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्रभाकर घार्गे, आमदार निरंजन डावखरे, वत्सलाताई पाटील, रमेश पाटील, आमदार नरेंद्र पाटील, डॉ. प्राची पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. अजित पवार म्हणाले, ‘अब के बाद डान्सबारवाले हे सरकार जातीयवादी विचारांचे असून, सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत ढकलत आहे. कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास अपयश आले आहे. शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. चुकीचे कायदे वापरून सहकार चळवळ उद्ध्वस्त करण्याचा डाव सर्वसामान्य जनतेला घातक ठरणार आहे. सोशल मीडियाचा वापर करून मोदींनी स्वत:चा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी एका वर्षात ८५० कोटींचा चुराडा केला आहे. अडचणींवर मात करत सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांची नसल्यानेच माथाडीसह कष्टकरी शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ लागली आहे. यापुढे सावध राहावे लागेल. धरणग्रस्तांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, प्रलंबित प्रश्नासाठी आगामी काळात जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज व्हा, राष्ट्रवादीची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा,’ असे आवाहन केले. (वार्ताहर) यकुल मारल्याशिवाय डुकरं हलणार नाहीत...तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सांगताना आमदार नरेंद्र पाटील यांनी डुकराकडून नुकसान होत असल्याचे सांगितले. त्यांना मारण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली. यावर बोलताना आमदार शिंदे म्हणाले, ‘डुकराचं नेतृत्त्व करणारं यकुल मारल्याशिवाय डुकरं हलणार नाहीत,’ यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.
सरकारला शेतकरी हिसका दाखवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2016 11:38 PM