मलकापूर : ‘गेल्या आठवड्यात मलकापूर परिसरात उद्भवलेली अतिसाराची परिस्थिती ही पाण्यातील वाढत्या क्लोरीनच्या प्रमाणामुळेच पसरली असल्याचे नुकतेच सिद्ध झाले आहे. तपासण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यावरून हे सिध्द झाले असून, संबंधित विभागातील आठ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा देण्यात आल्या असून दोन दिवसांत याबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती जलअभियंता यू. पी. बागडे यांनी दिली. दरम्यान, सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत खासगी रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन पथकांकडे ५० रुग्णांनी उपचार घेतले होते. मात्र, गेल्या चार दिवसांच्या तुलनेत नवीन रुग्णांमध्ये घट झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. गुरुवार पासून मलकापुरात पिण्याच्या पाण्यात क्लोरीनचा डोस वाढल्यामुळे हजारो नागरिकांना अतिसाराचा त्रास झाल्याची बाब निदर्शनास येताच, येथील पाणीपुरवठा विभागाने क्लोरीन गॅसची मात्रा तातडीने कमी केली; मात्र त्यामुळे हजारो नागरिकांना अतिसाराची लागण झाली. क्लोरीनची मात्रा नेहमीपेक्षा जास्त झाली. याला जबाबदार कोण ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. (वार्ताहर)दूषित पाणीपुरवठा तत्काळ बंद करा गेल्या चार दिवसांपासून मलकापुरात अतिसाराची परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीला मलकापुरातील दूषित पाणीपुरवठा जबाबदार आहे. हा दूषित पाणीपुवठा त्वरित थांबवावा, अशी मागणी अशोकराव थोरात यांनी नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.हा कोणताही साथीचा रोग नसून क्लोरीनच्या वाढत्या डोसामुळेच तो उद्भवला आहे. नागरिकांनी थेट नळाचे पाणी न पिता त्याऐवजी पाणी थोडावेळ उघडे ठेवून मग प्यावे. जेणेकरून पाणी उघडे ठेवल्यास पाण्यातील क्लोरीनचे प्रमाण कमी होईल. प्राथमिक स्वरूपात हा उपाय सर्व नागरिकांनी करावा. - डॉ. राजेंद्र यादव,वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, काले.
आठ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’
By admin | Published: July 22, 2015 9:37 PM