महाबळेश्वर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २१ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या निधीचा धनादेशही क्षेत्र महाबळेश्वरच्या सरपंच सारिका पुजारी यांनी तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द केला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ह्यमुख्यमंत्री सहाय्यता निधीह्णसाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. या उद्देशाने श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टची बैठक झाली होती. या बैठकीत श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २१ लाख रुपयांचा निधी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार २१ लाखांच्या निधीचा धनादेश सरपंच सारिका राजेंद्र पुजारी यांच्या हस्ते तहसीलदार सुषमा पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपसरपंच सुनील बिरामणे, देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक देवेंद्र जगताप आदी उपस्थित होते.श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.
दरम्यान, तालुक्यातील पार येथील श्री रामवरदायिनी देवस्थानकडून २१ हजारांचा तर संयुक्त वनव्यवस्थापन महासमिती व वनविभागाच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाखाचा धनादेश तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.