रामापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रशासकीय पातळीवर घेण्यात येत असलेले निर्णय सामाजिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून येथील श्रीराम जन्मोत्सवाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. हा सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
३६५ वर्षांची परंपरा असलेला आणि प्रथेप्रमाणे गुढीपाडव्यापासून सुरू होणारा येथील श्रीमंत सरदार पाटणकर यांच्या 'शिक्कामेंशन' वाड्यातील श्रीराम मंदिरामधील श्रीराम जन्मोत्सव सोहळा आणि श्रीरामनवमी उत्सव सलग दुसऱ्या वर्षी केवळ पारंपरिक धार्मिक विधी करून साधेपणाने साजरा करण्यात आला.
समर्थ रामदास स्वामी यांनी पाटणकर घराण्यातील चांदजीराव पाटणकर यांना १६५६ मध्ये प्रसाद म्हणून दिलेल्या पंचधातूच्या पट्टाभिराममूर्तीची विधीवत पूजाअर्चेची परंपरा ३६५ वर्षांपासून पाटणकर घराण्यातील प्रत्येक पिढीने जपली आहे.
प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार परंपरेप्रमाणे गुढीपाडव्यापासून श्रीरामनवमीपर्यंत होणाऱ्या श्री रामजन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने आयोजित सर्व दैनंदिन भजन, कीर्तनासह महाप्रसाद तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. मात्र, प्रथेप्रमाणे दैनंदिन पूजाअर्चा व परंपरागत धार्मिक विधी नित्यनेमाने सुरू होते. श्रीरामनवमी उत्सवाच्या निमित्ताने येथे भरणारी यात्राही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली. यात्रेनिमित्ताने येथे येणाऱ्या प्रसाद, मिठाई, खेळण्यांंच्या दुुकानांना बंदी घालण्यात आल्यामुळे परिसरात शांंतता होती. प्रथेेेप्रमाणे श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा पाटणकर घराण्यातील व्यक्ती, श्रीराम देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, पुरोहित अशा मोजक्या व्यक्तींंच्या उपस्थितीत झाला.
नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रशासन करीत असलेल्या उपाययोजना महत्त्वाच्या असूून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन अमरसिंह पाटणकर यांनी केले आहे.
फोटो प्रवीण जाधव यांनी पाठविला आहे.
पाटण येथे श्रीरामनवमी निमित्ताने श्रीमंत सरदार यांच्या वाड्यातील श्रीराम मंदिरात आकर्षक सजावट केली होती. (छाया : प्रवीण जाधव)