सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे रामदास स्वामी गुरू होते, याबाबतचे पुरावे कुठेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे राजवाडा येथील एसटी बसस्थानकामध्ये लावण्यात आलेले रामदास स्वामी यांचे शिल्प हटवावे, अन्यथा शिवप्रेमी हे शिल्प फोडून टाकतील, असा इशारा इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी दिला आहे.येथील विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे पार्थ पोळके, माजी नगरसेवक अमर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.कोकाटे म्हणाले, खोटा इतिहास लोकांच्या माथी मारण्याचे काम आरएसएस करत आहे. साताऱ्यातील राजवाड्यावर देखील शिवाजी महाराजांसोबत रामदास स्वामी यांचे शिल्प लावण्यात आले. शिवप्रेमींनी एसटी महामंडळ, जिल्हा प्रशासन, नगरपालिका यांची भेट घेऊन हे शिल्प हटविण्याबाबतचे निवेदन दिले होते.मात्र, तरीदेखील हे शिल्प हटवले गेले नाही, आता झाकून ठेवलेले शिल्प पुन्हा समोर आणले गेलेले आहे. या शिल्पाच्या उद्घाटनाची पत्रिका काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत होती. मला देखील ती मिळाली होती. पोलिसांना याबाबतची माहिती नव्हती का? त्यांनी ते अनधिकृत उद्घाटन करूच कसे दिले. इतिहासाशी कोणताही संबंध नसलेल्या या शिल्प हटवले नाही तर शिवप्रेमी हे शिल्प फोडून टाकतील.पार्थ पोळके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांना भाजपने निवडणुकीचे हत्यार केले आहे. रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट कधी झाली, हे भाजप आणि आरएसएसने दाखवून द्यावे. रामदास स्वामी आरएसएसचे प्रेरणास्थान आहे.साताऱ्यातील शिल्पाचे उद्घाटन हे दंगल घडवण्याच्या उद्देशानेच केले आहे. आरएसएसच्या एका विंगचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. आम्ही कायद्याचे पालन करतो, दंगल घडवण्याच्या आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा उद्देशाने केलेल्या कृत्याला प्रशासनाने खतपाणी घालू नये. हे शिल्प लवकरात लवकर काढून टाकावे.
"..अन्यथा 'ते' शिल्प शिवप्रेमी फोडून टाकतील", इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंनी दिला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 4:03 PM