चाफळ : ‘बोल बजरंग बली की जय’, ‘सत् सीताराम की जय’, ‘प्रभू रामचंद्र की जय’ च्या जयघोषात हजारो भाविकांंच्या उपस्थितीमध्ये व सासनकाठ्यांच्या साक्षीने चाफळचा श्रीराम रथोत्सव शुक्रवारी सूर्योदयाबरोबर अभूतपूर्व वातावरणात साजरा करण्यात आला. गुलालाने माखलेल्या युवक -युवतींसह आबालवृद्धांनी परस्परांना गुलाल लावत आपला आनंद द्विगुणीत केला. ही वेळ नेमकी सूर्योदयाचीच असल्यामुळे यावेळी सूर्याचा लालिमा व गुलालाच्या उधळणीचा योगायोग भाविकांना अनुभवावयास आला. समर्थ रामदास स्वामींनी सन १६४८ पासून सुरू केलेला श्रीरामनवमी उत्सव साडेतीनशे वर्षांनंतरही अखंडितपणे तीर्थक्षेत्र चाफळ येथे सुरू आहे. यावर्षीचा हा ३७० वा रामनवमी उत्सव आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते एकादशी असा दहा दिवसांचा उत्सव सोहळा अभूतपूर्व वातावरणात साजरा केला जातो. नवमी, दशमी, एकादशी हे उत्सवाचे मुख्य तीन दिवस मानले जातात. चैत्र शुद्ध एकादशीला रामनवमी उत्सवाची सांगता होत असते. शुक्रवारी पहाटे काकड आरती होऊन समर्थ वंशज गादीचे अधिकारी अभिराम स्वामी यांच्या हस्ते श्रीरामाची महापूजा करण्यात आली. पहाटे पाच वाजता कीर्तनास प्रारंभ झाला. श्रीरामाची पट्टाभिषिक्त मूर्ती वाजत-गाजत पालखीतून दिवट्या, मशालीसह मंदिर प्रदक्षिणा घालून सवाद्य चांदीच्या पालखीमधून रथाकडे आणण्यात आली. यावेळी समर्थांचे वंशज अभिराम स्वामी यांच्या हस्ते रथाच्या चारी चाकांवर नारळ फोडण्यात आले. नंतर अधिकारी स्वामींच्या हस्ते चाफळसह भागातील बारा बलुतेदार व मानकरी यांच्या मानाचे नारळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ‘सत् सीताराम की जय’ च्या प्रचंड जयघोषात भाविकांनी रथ ओढायला सुरुवात केली. रथासमोर चांदीची पालखी, सुवासिक फुलांच्या माळा, मानाच्या सासनकाठ्या, सजवलेले घोडे, शेकडो मशाली, समर्थांचे वंशज, उत्सवाचे मानकरी आणि हजारो भक्त प्रभू रामाचा जय जयकार करीत रथ ओढत होते. मंदिरापासून निघालेला रथोत्सव सकाळी सूर्योदयावेळी कालेश्वरी मारुती मंदिर, महारुद्र स्वामींच्या समाधी मंदिरमार्गे बसस्थानकाजवळ पोहोचल्यानंतर तेथून परत पुन्हा मंदिराच्या पायथ्यापर्यंत आणण्यात आला. संपूर्ण रथ नवसाचे नारळ व नोटांनी झाकोळलेला होता. रथोत्सवासाठी चाफळसह परिसरातील भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात हजेरी लावली होती. डोळेगाव, पाडळी व अंगापूर येथील मानाच्या सासनकाठ्या सहभागी झाल्या होत्या. गुलालमय वातावरणात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच मंडळी दंग होऊन गेली होती. श्रीराम मूर्ती पालखीतून मंदिरात आणल्यानंतर सुवासिनींनी पंचारतीने ओवाळले. यावेळी मुख्य दरवाजातच दही-भात व नारळचा नैवेद्य देण्यात आला. पालखी मंदिरात आल्यानंतर लळिताचे कीर्तन सरूझाले. उत्सवाच्या सांगतेला लळीत झाल्यावर उत्सवातील सर्व सहभागी मानकरी व कार्यकर्त्यांना अधिकारी स्वामींच्या हस्ते मानपान देण्यात आले. या उत्सवातील एक भाग म्हणजेच भिक्षावळ. गुरुवारी समर्थ वंशजांच्या उपस्थितीत सकाळी नगरप्रदक्षिणेने भिक्षावळ झाली. रात्री ८ वाजता मंदिरातील करुणाष्टके, सवाया झाल्यानंतर रथाचे मानकरी साळुंखे बंधूंनी विमानरुपी प्रतिकृतीची रथामध्ये प्रतिष्ठापना केली. रात्री ९ वाजता जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेश पवार यांच्या उपस्थितीत फटाक्यांची भव्य आतषबाजी करण्यात आली. उत्सव सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्रीराम देवस्थान ट्रस्ट, विश्वस्त चंद्रकांत पाटील, अनिल साळुंखे व व्यवस्थापक बा. मा. सुतार, सरपंच संध्याराणी पाटील, उपसरपंच अंकुश जमदाडे, पोलिस पाटील दिलीप पाटील, यात्रा कमिटी अध्यक्ष एल. एस. बाबर, उपाध्यक्ष संजय साळुंखे यांच्यासह कुस्ती कमिटी, भंडारा कमिटी व मध्यवर्ती यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
हजारोंच्या सहभागाने श्रीराम रथोत्सव सजला !
By admin | Published: April 07, 2017 10:51 PM