कऱ्हाड : कोरोनासंसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने खेडेगावातील सर्व व्यवहार बंद राहिले आहेत. कार्वे, कोरेगाव, कोडोली, दुशेरे, शेरे, शेणोलीसह वडगाव हवेली परिसरातील संपूर्ण जनजीवन सध्या ठप्प झाले आहे. कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. गर्दी टाळण्यासाठी व गर्दीपासून होणारा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र उपाययोजना करण्यात येत आहेत.
वाहने जप्त
कऱ्हाड : शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून चौकशी करून कारवाई करण्यात येत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने पोलिसांनी जप्त केली असून, वाहतूक शाखेत ती लावण्यात आली आहेत. शहरातील कोल्हापूर नाका, भेदाचौक, विजय दिवस चौक, तसेच कृष्णा नाक्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. त्याठिकाणी वाहनधारकांची कसून चौकशी केली जाते.
फ्यूज बॉक्सची दुर्दशा
तांबवे : कऱ्हाड ते पाटण मार्गावर रस्त्याकडेला अनेक ठिकाणी असलेले फ्यूज बॉक्स उघडे पडलेले आहेत. काही ठिकाणी हे बॉक्स अक्षरश: जमिनीला टेकले आहेत, तर काही ठिकाणी फ्यूजही गायब झाले असून, तारांवरच खेळ सुरू आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून, वीज वितरणने धोकादायक फ्यूज बॉक्स हटविण्याची मागणी होत आहे.
औषध फवारणी
कऱ्हाड : कालेटेक, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीकडून गावात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. याची सुरुवात सरपंच अॅड. पंडितराव हरदास, उपसरपंच अजित यादव यांच्या हस्ते करण्यात आली. कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतीकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, ग्रामस्थही त्याला प्रतिसाद देत आहेत.