स्वप्नील शिंदे सातारा : सध्या देशात सर्वच क्षेत्रात आर्थिक मंदीच्या झळा जाणवू लागल्या आहेत. यामध्ये विशेषत: वाहन निर्मिती व विक्री क्षेत्रात त्याचे तीव्र परिणाम दिसू लागले आहेत. सातारा जिल्ह्यात दुचाकी, कार, मालवाहतूक व कृषी वाहनांच्या विक्रीमध्ये २५ ते ३० टक्के घट झाली असून, ४० वितरकांची दुकाने बंद पडली आहेत. त्यामुळे या दुकानांमध्ये काम करणारे सेल्समन, अकाऊंटंट आदींवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.गेल्या वर्षभरापासून देशातील वाहनक्षेत्रात निर्माण झालेल्या मंदीची झळ वाहननिर्मात्या कंपन्यांना बसत असताना याचा सर्वाधिक परिणाम वाहन कंपन्यांच्या वितरकांवर दिसून येत आहे. मागील एक वर्षापासून विक्रीत निम्म्यापेक्षा अधिक घट झाली आहे. आधी महिन्याला ५५ ते ६० कार विकल्या जात.
आता ४० ते ४५ गाड्यांची विक्री होते. तर दुचाकी विक्री ६०० वरून ४५० ते ५०० वर आली आहे. व्यवसाय कमी झाल्याने तीन कामगारांना कमी केले. १८ महिन्यांत सातारा जिल्हा क्षेत्रातील ४० वितरकांची दुकाने बंद पडली असून, तेथे काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे.जिल्ह्यातील दुचाकी व कार विक्रीमध्ये कमालीची घट झाली आहे. काही महिन्यांपासून चौकशीसाठीही ग्राहक येत नाही. वितरकांचा खर्च वाढल्याने ग्रामीण भागातील दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही ठिकाणी कामगार कपात केली आहे.दुकाने बंद होण्याची कारणे
- वस्तू व सेवा करवाढ १८ टक्क्यांवरून २८ टक्के
- वाढलेले नोंदणी शुल्क
- पाच वर्षांच्या वाहन विम्याची सक्ती
- वाहनांच्या ‘आॅन रोड’ किमतीत भरमसाठ वाढ
- वितरकांच्या मार्जीनमध्ये घट
- इलेक्ट्रीक वाहनांची वाढती संख्या
नोटाबंदीनंतर बाजारातील पैशाचा प्रवाह कमी असणे, विमा किमतीतील वाढ, पेट्रोल- डिझेलच्या किमतीतील वाढ तसेच इलेक्ट्रिक वाहने बाजारात आल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था आहे.- सचिन शेळके,अध्यक्ष, आॅटोमोबाईल डिलर्स असोसिशन