लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा प्रशासनाने १५ मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला असल्याने या कालावधीत किराणा मालाचे दुकानही उघडे ठेवायचे नाही, असे आदेश असतानाही सातारा शहरातील बाजारपेठांमध्ये मात्र ग्राहकांची वाट पाहत असलेले व्यापारी दुकानांच्या पायर्यांवर उभे असेलेले दिसतात. ग्राहक येताच दुकानाचे शटर उघडले जाते आणि माल दिला जातो.
जिल्ह्यात हॉस्पिटल आणि औषध विक्री दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे तर किराणा माल व इतर भाजीपाला असेच जीवनावश्यक साहित्य ग्राहकांकडून ऑर्डर घेऊन घरपोच करण्याबाबतच्या सूचना आहेत. मात्र, व्यापारी पेठेतील सोने-चांदी, कपडे यांची दुकाने उघडी ठेवायला परवानगी नाही.
मात्र, कायद्याचा भंग करत सातारा शहरामध्ये सर्रासपणे बाजारपेठांतील दुकाने गुपचूप उघडून ग्राहकांना माल दिला जात आहे. पालिका प्रशासनाचेही याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. बाजारपेठेतील व्यापारी सकाळपासूनच दुकानाच्या पायऱ्यांवर येऊन बसतात अथवा उभे राहतात. एखादा ग्राहक आला की, त्याच्या मागणीनुसार त्याला साहित्य दिले जाते.
कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी प्रशासनाने लॉकडाऊनचे आदेश काढले आहेत. मात्र, व्यापाऱ्यांना अजूनही मृत्यूपेक्षा पैसा प्रिय असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. ह्या पैशाच्या लोभापायी कोरोनासारखी महामारी आपण घरी घेऊन जाऊ, ही भीती ग्राहकांच्या मनातदेखील राहिलेली नाही.
चौकट..
गल्ला भरल्याशिवाय चैन पडेना
व्यापारी पेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते. शनिवारी बाजारपेठ बंद असली तरीदेखील सुट्टीतच गल्ला भरेल म्हणून काहीजण दुकाने उघडी ठेवत असतात. आता तर कोरोनाच्या काळात दुकान उघडता येईना, अशी गोची होऊन बसली आहे, त्यातूनच काहींना गल्ला भरल्याशिवाय चैन पडत नाही, अशी परिस्थिती आहे.
चौकट...
कसला आलाय कोरोना... सबसे बडा रुपया!
जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा सव्वा लाखांच्या आसपास आहे तर या महामारीमुळे तब्बल सव्वातीन हजार लोकांना जीव गमवावा लागलेला आहे. पैसा कमी कमवू शकतो पण जीव कमवता येणार नाही, असे म्हणत अनेकजण सुरक्षित आणि सावधपणे घरी बसून आहेत. मात्र, काही व्यापाऱ्यांच्या मनात ‘कसला आलाय कोरोना, सबसे बडा रुपया’ अशी भावना आहे.
फोटो ओळ : सातारा शहरातील बाजारपेठेत दुकानांच्या पायऱ्यावर अशा पद्धतीने ग्राहकांची वाट पाहिली जात आहे.