वाई : ‘मांढरदेव यात्रेदरम्यान भाविकांना अन्न आणि पाण्यापासून बाधा होऊ नये म्हणून पाणी पुरवठ्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवावेत. अन्नाची तपासणी करूनच ते भाविकांपर्यंत जाईल, याची खबरदारी संबंधित यंत्रणांनी घ्यावी. पशुबळी अथवा लिंबू, बिबे ठेवणे, झाडाला खिळे मारणे, वाद्य वाजविणे यावर बंदी असल्याने भाविकांनी त्याचे पालन करून पोलिस यंत्रणेला आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले.
मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा दि. १, २ व ३ जानेवारीदरम्यान होत आहे. त्या यात्रेच्या नियोजनाची जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बुधवारी पाहणी केली. त्यानंतर एमटीडीसी संकुलात सर्व संबंधित यंत्रणांचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, तहसीलदार अतुल म्हेत्रे आदींसह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी विविध विभागांचा आढावा घेऊन ग्रामपंचायतीमार्फत पाण्याचे शुद्धीकरण, तात्पुरत्या शौचालयांची उपलब्धता, जंतुनाशक औषध फवारणी, त्याचबरोबर रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही, याबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. कचरा होऊ नये, यासाठी दर्शन मार्गावर जागोजागी कचरा कुंड्या ठेवण्यात येणार आहेत. खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी ठराविक ठिकाणी होऊ नये, यादृष्टीने स्टॉलधारकांच्या जागांचे नियमन करावे. अन्न धान्यांच्या स्टॉलला परवानगी देताना अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना घेणे बंधनकारक करावे. मांढरदेव परिसरात नारळ फोडण्यास आणि तेल वाहण्यास पूर्णत: बंदी करण्यात आली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
सर्व यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेवावा, अशा सूचना करून जिल्हाधिकारी सिंघल पुढे म्हणाल्या, ‘ही यात्रा यशस्वी करण्यासाठी आपणाला नेमून दिलेली जबाबदारी पूर्ण करावी. बीएसएनएलने आवश्यक ते दूरध्वनी जोडणी जोडण्यात याव्यात. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाने पथके तैनात ठेवून तपासणी करावी, प्रवाशांसाठी पुरेशा व सुस्थितीत एसटी ठेवाव्यात,’ अशा सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.
जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनीही सुरक्षेच्या दृष्टीने सूचना दिल्या. जिथे-जिथे सुरक्षिततेच्या बाबतीत कमतरता आहेत, त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांना सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डे भरून दुरुस्त केले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक कठडे तयार करण्यात येत आहेत. ज्या बाबी अजूनही अपूर्ण आहेत, त्या तत्काळ पूर्ण कराव्यात. सर्व विभागांनी सतर्क राहून एकमेकांच्या समन्वयाने काम करा. कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहून अशा घटना घडूच नयेत म्हणून आधीपासूनच काळजी घ्यावी. यात्रा काळात समस्या, अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने सर्वांनी जबाबदारीने काम करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केल्या. बैठकीनंतर प्रत्येक ठिकाणाची बारकाईने पाहणी करून संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या.एसटी महामंडळाकडून या यात्रा कालावधीत ७६ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.एक वाहतूक नियंत्रक अधिकाºयांच्या नियंत्रणाखाली यात्रेच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाचे बसस्थानक स्थापन करणार आहे.आरोग्य विभागाकडून ३३ डॉक्टरांसह ११६ लोकांची टीम दिवसरात्र कार्यरत राहणार आहे.आरटीओ आणि पोलिसांची गस्त टीम गाड्यांची तपासणी करणार आहे.
सर्व विभागांचा योग्य समन्वय राहावा, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने एकूण सोळा वॉकीटॉकी संचही दिले जाणार आहेत.पशुहत्या बंदीबाबत सर्वत्र फलक लावण्यात येणार असून, साफसफाईसाठी कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे.काळजी घेण्याबाबत फलक लावण्यात येतील.यात्रेदरम्यान तीन दिवस वाई शहर परिसरात मद्यविक्री बंद ठेवण्याच्या सूचना.