वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील राजकीयदृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या देऊर ग्रामपंचायतीच्या सरपंच श्यामराव हरिश्चंद्र कदम यांची तर उपसरपंचपदी श्रीधर विठ्ठल कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी सकाळी ११च्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी अमर निंबाळकर यांच्या उपस्थितीत सरपंचपदासाठी श्यामराव हरिश्चंद्र कदम यांचा, तर उपसरपंचपदासाठी श्रीधर विठ्ठल कदम यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे सरपंचपदी श्यामराव हरिश्चंद्र कदम, तर उपसरपंचपदी श्रीधर विठ्ठल कदम यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली.
देऊर ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी शेतकरी पॅनलला हद्दपार करत आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील श्री मुधाई देवी परिवर्तन पॅनेलने अकरापैकी आठ जागा मिळवत ग्रामपंचायतीवर निर्विवाद सत्ता मिळवली होती. सत्ता परिवर्तनासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल कदम, श्री मुधाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनसिंग कदम, गुलाबसिंग कदम यांनी मोठे परिश्रम घेतले होते.
नवोदित पदाधिकाऱ्यांचे आमदार महेश शिंदे, सुनील खत्री यांनी कौतुक केले.