सातारा : सातारा नगरपालिकेच्या बांधकाम सभापती सिद्धी रवींद्र पवार यांनी अखेर आपल्या सभापतिपदाचा अधिकृतरीत्या राजीनामा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना शुक्रवारी सादर केला.
भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराला आक्षेपार्ह शब्दांत धमकाविल्याप्रकरणी भाजप नगरसेविका व बांधकाम सभापती सिद्धी पवार यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे साताऱ्यात जोरदार राजकीय पडसाद उमटले होते. सिद्धी पवार यांनी आपली नाराजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे पत्राद्वारे प्रकट करून बांधकाम सभापतिपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. तसेच सातारा विकास आघाडीवरही ऑडिओ क्लिपद्वारे तोफ डागली होती. यानंतर सिद्धी पवार यांचाही नगराध्यांकडून पत्रकाद्वारे समाचार घेण्यात आला होता. अखेर पवार यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला रीतसर राजीनामा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना सादर केला. नगराध्यक्षांना राजीनामा पाठविण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. राजीनामापत्रात त्यांनी एका स्त्रीची व्यक्तिगत पातळीवर झालेली बदनामी, खालच्या पातळीवर पोचलेले राजकारण, विकासकामाचा आग्रह धरलेला असताना सातत्याने होणारी कोंडी, अंतर्गत बेबनाव या विविध कारणांना कंटाळून आपण बांधकाम सभापतिपदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.