लोणंद : लोणंदमधून जात असलेल्या सातारा रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान
होत आहे.
लोणंद शहरातून सातारा शिरूर हा महामार्ग जातो. दोन वर्षांपासून हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग केला असल्याने सार्वजनिक बांधकाम खाते याकडे लक्ष देत नाही. महामार्गाचे अधिकारीही या रस्त्याकडे गांभीर्याने पाहात नसल्याने या रस्त्याला कोणीही वाली नाही, अशी अवस्था आहे.
लोणंद येथील अहिल्यादेवी स्मारकापासून ते गोठेमाळ येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीपर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली असून, वाहनधारकांना मोठी कसरत करत वाहन चालवावे लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या मार्गावर अनेक अपघातही झाले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे मोठी वाहने आपटल्याने वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंट क्राँक्रिटने रस्त्याची डागडुजी केली. मात्र, परिस्थिती पुन्हा जैसे-थे झाली आहे. लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी वाहन चालकांमधून केली जात आहे.
०५लोणंद-रोड
लोणंद येथील सातारा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. (छाया : संतोष खरात)