सणबूर : इंधन दरवाढीस केंद्र सरकारची चुकीची धोरणेच कारणीभूत आहेत. यापूर्वी आंदोलन करूनही केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून स्वाक्षरी अभियान सुरू करण्यात आले असून, ढेबेवाडी विभागातही स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेस जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य अभिजित पाटील म्हणाले, ‘पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, डाळीसह सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीला केंद्राची धोरणे जबाबदार आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. कोरोनामुळे जनता हैराण झाली असताना ही दरवाढ कशाला? दरवाढीविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीकडून यापूर्वीही आंदोलन करण्यात आले होते. मात्र, केंद्र सरकारने महागाई वाढीकडेच दुर्लक्ष करीत सर्वसामान्यांची एकप्रकारे लूटच केली आहे. कोरोनामुळे सर्वांची वाईट अवस्था झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसकडून स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
यावेळी पाटण तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र पाटणकर, आनंदकुमार कांबळे, सोशल मीडियाप्रमुख मेघराज धस, प्रतीक कोळेकर, चंद्रकांत कांबळे, गणेश साबळे, पंजाबराव कुंभार आदी उपस्थित होते.
फोटो : २२केआरडी०१
कॅप्शन : ढेबेवाडी, ता. पाटण येथे केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करीत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे.