सातारा : राष्ट्रपतिपद हे देशातील सर्वोच्च असून सध्या या पदासाठी निवडणूक सुरू झाली आहे. भाजपकडून द्रौपदी मुर्मू या उमेदवार असून त्यांच्या अर्जावर खासदार उदयनराजे भोसले यांनी सूचक म्हणून सही केली. यामुळे सातारकरांना एक प्रकारे हा मानच मिळाला आहे.
देशाचा कारभार पंतप्रधानांच्या हाती असला तरी सर्वोच्च पद हे राष्ट्रपतींचे असते. सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत. त्यांचा पंचवार्षिक कार्यकाल पुढील महिन्यात २४ जुलै रोजी संपत आहे, तर २५ जुलै रोजी नवीन राष्ट्रपती पदभार घेतील. या निवडणुकीसाठी भाजपने एनडीएच्या उमेदवार म्हणून झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांचे नाव जाहीर केले. तर विरोधी पक्षांकडून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली.
राष्ट्रपतिपदासाठी १५ जूनपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. २९ जून ही शेवटची तारीख आहे. दिल्ली येथे भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्या नामांकन अर्जावर सूचक म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांनी सही केली आहे. या वेळी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.