कराड : देशात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. मणिपूर येथे महिलांवर झालेले अत्याचार देशाला हादरवून टाकणारे आहेत. या अत्याचारा विरोधात तमाम महिलांनी पेटून उठले पाहिजे. रस्त्यावर उतरून न्याय मागितला पाहिजे अशा भावना शनिवारी कराडात अनेक महिलांनी व्यक्त केल्या.
कराडात मणिपूर घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मुकमोर्च्याच्या समारोप प्रसंगी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.मोर्चात काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा गीतांजली थोरात,तालुका अध्यक्षा विद्या थोरवडे, वैशाली सोनावले,आनंदराव लादे, डॉ. सुधीर कुंभार, वैशाली रायते, अझर पटेल, अॅड. पंडीत गायकवाड, विद्याधर गायकवाड यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
मणिपूर येथे झालेल्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ कराडमध्ये भारतीय संविधान सभा, समता सामाजिक संस्था यासह विविध सामाजिक संस्थांच्या वतीने शनिवारी मूक मोर्चा काढण्यात आला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि संविधान प्रस्ताविकेचे वाचन करून मूक मोर्चास प्रारंभ झाला. यावेळी आंदोलकांनी तोंडावर व दंडावर काळ्या फिती बांधून मणिपूर मधील घटनेचा निषेध केला.
मूक मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून महात्मा फुले चौक, बापूजी साळुंखे पुतळ्यापासून दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आला. येथे आंदोलकांनी मणिपूर मधील घटनेचा निषेध नोंदवला.मोर्चात संविधान प्रचारक, समता सामाजिक संस्था, मानवाधिकार संघटना, काँग्रेस महिला आघाडी, अंधश्रध्दा निर्मूलन, एमएनरॉय संस्था, मी नागरिक फौंडेशन, संस्कार सोशन फाउंडेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी, दि. बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया, वचिंत बहुजन आघाडी, बीआरएसपी आदी संघटनांनी सहभाग घेतला होता.