सातारा : चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी दरम्यान दरवर्षी श्रीराम नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र मागील वर्षापासून या उत्सवाला कोरोना संकटाचे ग्रहण लागले आहे. मागील वर्षी कोरोनाची व्याप्ती कमी प्रमाणात असली तरी त्याची भीती लोकांमध्ये होती. मात्र, यावर्षी जिल्हा प्रशासनाच्या आदेशामुळे सध्या धार्मिक कार्यक्रम आणि उत्सवाला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मराठी नववर्षाचा प्रथम दिवस अर्थात गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहुर्तांपैकी एक असूनही सातारा जिल्हावासीयांनी अतिशय साधेपणाने घरोघरी गुढी उभारून आणि घरामध्येच श्री रामरायाचे पूजन, भजन, आरती आणि चिंतन करत मनोभावे साजरा केला.
जिल्ह्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद असल्यामुळे राम भक्तांना आपल्या उत्साहावर पाणी फेरावे लागले. दरम्यान, सातारा शहरातील श्री कृष्ण यजुर्वेद पाठशाळा यांच्यावतीने १९९२ पासून सुरू असलेला श्रीराम महायज्ञही यावर्षी कोरोना संकटामुळे स्थगित करण्यात आला. त्यामुळे गेली ३२ वर्षांची ही अव्याहत सुरू असलेली हवन परंपरा खंडित झाली. यावर्षी या पाठशाळेत शिकणारे आणि वेदाध्ययन करणारे अनेक शिष्यही कोरोनामुळे वेद पठण आणि वेदाध्ययन करू शकत नाहीत. त्यांना आपापल्या आईवडिलांकडे घरी पाठविण्यात आले आहे अशी माहिती वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांनी दिली.
दरम्यान, सातारा शहरातील मंगळवार पेठेतील श्री काळाराम मंदिरात राम नवरात्र उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. वेदमूर्ती शैलेश केळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र शहा व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते संकल्प, पुण्याहवाचन, नांदीश्राद्ध करून राम नवरात्राला प्रारंभ झाला. गुढीपाडव्याचे औचित्य साधून श्री काळाराम मंदिरात आकर्षक पूजेत फुलांची सजावट करून देवघरामध्ये विविध रंगांची विद्युत रोषणाई नेत्रदीपकपणे साकारली होती. मात्र, रामरायाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांना बंदी असल्यामुळे केवळ धार्मिक उपचार आणि कार्यक्रम झाले.
सातारा शहरातील प्रतापगंज पेठेतील श्री गोराराम मंदिरातही वेदमूर्ती बोरीकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राम नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. शहरातील शाहूपुरी गेंडामाळ परिसरातील श्री राम ध्यान मंदिर, शनिवार पेठेतील श्री शहा राम मंदिर, समर्थ मंदिरनजीकच्या श्री दामले राम मंदिर, शनिवार पेठेतील श्री माटे राम मंदिर आदी मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तीपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला.