सातारा : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा - दोन मंजुरी पत्र आणि प्रथम हप्ता वितरण कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता जिल्ह्यातील १ हजार ४९२ ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा होणार आहे. या सभेत घरकुलाच्या अनुषंगाने विविध विषयांवरही चर्चा करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी या ग्रामसभेबाबत सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व १ हजार ४९२ ग्रामपंचायतीत शनिवार, दि. २२ रोजी दुपारी दीड वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत सूचविण्यात आलेले आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा - २ मधील मंजुरी पत्र, प्रथम हप्ता वितरण कार्यक्रमांच्या अनुषंगाने कार्यवाही करणे, लाभार`थींनी घरकुलाचे बांधकाम गतीने पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन, अपूर्ण घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी उत्तेजन तसेच विविध विभागाकडील योजनांचा लाभ देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत कार्यालय इमारतीत १०० टक्के साैरऊर्जा प्रणाली बसविणे, रेन वाॅटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर उभारणे, प्रत्येक तालुक्यातून किमान पाच गावे १०० टक्के सौर उर्जायुक्त करणे, १०० टक्के कुटुंबांच्या स्तरावर ओला आणि सुका कचऱ्याचे विलगीकरण करणे आदींबाबतही ग्रामसभेत चर्चा करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यातील १४९२ ग्रामपंचायतीत शनिवारी होणार एकाचवेळी ग्रामसभा
By नितीन काळेल | Updated: February 18, 2025 19:38 IST