प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : शिवसेनेतील बंडाळीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळले आहे. हा बंडाचा झेंडा खांद्यावर घेणारे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यात आपले संघटन बळकट करण्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कऱ्हाडच्या प्रीतिसंगमावर गेले दोन दिवस त्यांचे समन्वयक तळ ठोकून आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या दिमतीला कऱ्हाडमधील ''सिंह''सेना दिसत आहे. त्यामुळे उलट सुलट राजकीय चर्चा ऐकायला मिळतात.
कऱ्हाड पाटण तालुका हे मूळचा काँग्रेस विचाराचा मानला जातो. मात्र, शंभूराजांच्या रूपाने पाटणला भगवा फडकला आहे. कऱ्हाड तालुक्यात मात्र त्यांची जादू तशी मर्यादितच राहिली आहे; पण एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर कऱ्हाडमधील काही मातब्बर शिंदे गटावर ''मेहरबान'' होत असल्याचे चित्र दिसते.
एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील काही नगरसेवकांना कऱ्हाडला समन्वयक म्हणून पाठवून दिले आहे. महामार्गावरील एका हॉटेलात त्यांनी तळ ठोकला आहे. मूळच्या शिवसैनिकांच्या बरोबरच नवीन काहीजण हाताला लागतात का? याची चाचपणी ते करीत आहेत; पण या सगळ्या घडामोडीत कऱ्हाडमधील ''सिंह''सेना त्यांच्या दिमतीला असल्याचे दिसून आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा होणारच!
माजी पदाधिकारी सक्रिय
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर कऱ्हाड तालुक्यातील अनेक माजी पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने सक्रिय झालेले दिसतात. त्यात अविनाश फुके, हनुमंत घाडगे, गुलाबराव पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश दिसतो. आपल्यावर शिवसेनेने अन्याय केल्याची भावना या जुन्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी समन्वयक यांच्यासमोर व्यक्त केल्याचे समजते.
आजी पदाधिकाऱ्यांचा एक गटही धक्का देणार?
एकनाथ शिंदे गटाला मिळणारा प्रतिसाद पाहून सध्या उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणारा कऱ्हाड पाटण तालुक्यातील शिवसेनेचा आजी पदाधिकाऱ्यांचा एक गटही अस्वस्थ असल्याचे बोलले जाते. त्यांनी जर ठाकरेंना धक्का दिला तर आश्चर्य वाटायला नको. आता त्यात कोण कोण ''शिलेदार'' असणार हे लवकरच कळेल.
जिल्हाप्रमुख घेणार आज कऱ्हाडला बैठक
उद्धव ठाकरे यांनी हर्षद कदम यांची जिल्हाप्रमुखपदी निवड केल्यानंतर बुधवारी सकाळी ११ वाजता कऱ्हाड उत्तर व दक्षिण या दोन विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांची बैठक त्यांनी आयोजित केली आहे. या बैठकीत सद्य परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत. त्याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागून आहे.