सातारा : गडकरी आळी मार्गे शिवाजीनगर, सुयोग कॉलनी, समता पार्क मार्गे शाहूपुरी चौकाला जोडणारा रस्ता मृत्यूला आमंत्रण देणारा ठरत आहे. काही वर्षांपूर्वी तयार केलेला हा रस्ता पावसाच्या सरींनी वाहून गेल्यानंतर, वारंवार निवेदन देऊनही या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करून रस्ता दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा शाहूपुरीतील नागरिकांनी केली आहे.
साताऱ्याच्या हद्दवाढीत आलेला सुयोग कॉलनीतील हा रस्ता गेल्या पाच वर्षांपासून आहे त्याच स्थितीमध्ये आहे. दिवसेंदिवस या भागात लोकवस्ती वाढत आहे आणि रस्त्याची गुणवत्ता खालावत चालली आहे. रस्त्यावरचं डांबर गायब होऊन खडी उघडी पडली आहे. कित्येकदा सकाळी फिरायला येणाऱ्यांचे पाय या दगडांवरून घसरल्याने त्यांना गंभीर दुखापतीही झाल्या आहेत. रात्रीच्या अंधारात तर गाड्यांनाही रस्त्याचा अंदाज येत नसल्याने त्याही नाल्यात घसरत आहेत.
शहराचं उपनगर आणि आता हद्दवाढीत शहरात आलेला शाहूपुरी परिसर लोकसंख्येच्या दृष्टीनेही मोठा आहे. येथे राहणाऱ्या अनेकांना कामाच्या निमित्ताने शहरात यावं लागतं. मोठ्या शहरात नोकरीच्या निमित्ताने राहणाऱ्या अनेकांनी आपल्या पालकांना शांत आणि सुरक्षित ठिकाण म्हणून शाहूपुरीची निवड केली आहे. त्यामुळे या परिसरात ज्येष्ठांचा वावरही वाढता आहे. अशा परिस्थितीत रस्ता नादुरुस्त असल्याने, येथून जाणाऱ्या प्रत्येकाचे हाल होत आहेत. स्थानिक पातळीवरचं राजकारण बाजूला ठेऊन येथील रस्त्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
फोटो आहे