परळी : मागील महिन्यात डबेवाडी, ता. सातारा येथे वरातीत नाचण्याच्या कारणावरून एकाचा खून झाला होता. तेव्हापासून अद्यापही डबेवाडी ग्रामस्थ दहशतीतच जगत आहेत; परंतु आता संपूर्ण गावाने दहशत संपवण्याचा निर्णय घेतला आहे. गावामध्ये आता दोन ठिकाणी सायरन बसविण्यात येणार आहेत. तो वाजल्यानंतर ग्रामस्थ एकत्र जमणार आहेत. जून महिन्यात वरातीत नाचण्याच्या कारणावरून विकास पवार (रा. सातारा) याचा खून झाला होता. तेव्हापासून वाद चिघळला आहे. वारंवार साताऱ्यातील तरुण डबेवाडीतील तरुणांना, रिक्षाचालकांना त्रास देऊ लागले आहेत, अशा तक्रारी होत आहेत. यामध्ये सोनवडी, भोंदवडे, मस्करवाडी येथील मुलांना मारहाणही झाल्याचे सांगण्यात येत आहे. रिक्षा अडविल्याने शाब्दिक चकमकही झाल्या आहेत. यावर तोडगा म्हणून डबेवाडी, भोंदवडे ग्रामस्थांनी सोमवारी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना निवेदन देऊन दि. १४ रोजी डबेवाडी ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे त्यामध्ये स्पष्ट केले आहे. यावर उपाय म्हणून सातारा तालुका पोलिसांनी डबेवाडीतील पद्मावती मंदिरात बैठक घेतली. ग्रामस्थांनी आपले गाऱ्हाणे तसेच दहशत कशी निर्माण करतात ते सांगितले. पोलीस व ग्रामस्थांनी गावात दोन ठिकाणी सायरन बसविण्याचा निर्णय घेतला. परिसरात कोणतीही घटना घडली की सायरन वाजवायचा आणि सर्वांनी पद्मावती मंदिराजवळ जमायचे असा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी गावामध्ये काही दिवस पोलीस संरक्षण देण्यात येईल, असे सांगितले आहे. (वार्ताहर)
डबेवाडीत दोन ठिकाणी सायरन
By admin | Published: July 11, 2014 12:25 AM