परळी : दहावीचा पेपर देऊन चुलतभावाच्या लग्नासाठी दुचाकीवरून निघालेल्या बहीण-भावाचा डबेवाडीजवळ अपघात झाला. या अपघातानंतर त्यांची दुचाकी जळून खाक झाली. हा अपघात शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला. जखमी बहीण-भावावर सातारच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुनील किसन माने (वय १८), मोहिनी किसन माने (१६, दोघेही रा. मस्करवाडी, ता. सातारा) अशी जखमी बहीण-भावाची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सुनील आणि मोहिनीचा शनिवारी इंग्रजी विषयाचा पेपर होता. दुपारी दोन वाजता पेपर सुटल्यानंतर हे दोघे दुचाकीवरून सोनवडीहून सोनगावकडे चुलतभावाच्या लग्नाला निघाले होते. सोनगाव येथील मंगल कार्यालयात त्यांच्या भावाचे लग्न होते. लग्नाला वेळेत पोहोचण्यासाठी हे दोघे दुचाकीवरून सुसाट निघाले होते. याचवेळी सातारा-सज्जनगड रस्त्यावरील डबेवाडी गावानजीकच्या जाधव चढ या ठिकाणी समोरून कार (एमएच ११ बीडी ५२४१) येत होती. या कारची आणि दुचाकीची (एमएच ११ ऐई ४४४७) समोरासमोर भीषण धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, मोहिनी कारवर पडून फेकली गेली, तर सुनील हा सुद्धा कारवर जोरदार आदळला. त्यांची दुचाकी कारला धडकून काही अंतर फरफटत गेली. त्यामुळे दुचाकीने अचानक पेट घेतला. केवळ दहा मिनिटांतच दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. जखमी सुनील आणि मोहिनीला काही नागरिकांनी तत्काळ दुसऱ्या वाहनाने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले; परंतु दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. (वार्ताहर) आख्खं वऱ्हाड रुग्णालयात लग्नाच्या मुहूर्ताला केवळ अर्धा तास बाकी असताना सुनील आणि मोहिनीचा अपघात झाल्याची बातमी लग्न समारंभात थडकली, तशी लग्नामध्ये शांतता पसरली. मिळेल त्या वाहनाने वऱ्हाडी मंडळीने रुग्णालयात धाव घेतली. प्रत्येकाला चिंता होती ती सुनील आणि मोहिनीची. लग्नाचा मुहूर्त बाजूला सारून सगळ्यांनी सुनील आणि मोहिनीला धीर दिला; परंतु ठरल्याप्रमाणे लग्नही होणे महत्त्वाचे असल्यामुळे अखेर वऱ्हाडी मंडळी पुन्हा मंगल कार्यालयात गेली आणि ठरल्याप्रमाणे विवाह पार पडला.
बहीण-भावाची गाडी जळून खाक
By admin | Published: March 08, 2015 12:14 AM