कातरखटाव : बऱ्याच वर्षांनंतर प्रवाशांचा वनवास संपलेल्या दहिवडी-मायणी या महामार्गावरील रस्त्याची महिन्याभरातच वाताहत पाहायला मिळत आहे. जेसीबीच्या साहाय्याने साईटपट्ट्यावर नाल्यातील काळी माती, दगड, टाकल्याने प्रवासी व नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बनपुरी ते तडवळे संबंधित ठेकेदारांनी साईटपट्टया टाकण्याचा नुसता दिखावा केला आहे. काही ठिकाणी माती, काही ठिकाणी दगड, तर दिखावा म्हणून कुठेतरी मुरूम दिसत आहे. अनेक ठिकाणी अंतरावरील साईटपट्ट्या रिकाम्या दिसत आहेत. रस्त्याचे तेरा किलोमीटर डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला होता; परंतु साईटपट्ट्यामध्ये रोलिंग न केल्यामुळे पावसाच्या रिपरिपमुळे चिखल होत असून वाहनधारकांना कसरत करावी लागतेय. त्याचबरोबर अपघातालाही निमंत्रण मिळत आहे.
अशातऱ्हेने नुकतेच डांबरीकरण झालेल्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना, नागरिकांना साईटपट्ट्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विकासकामाच्या दर्जाकडे प्रशासकीय अधिकारी लक्ष देणार का? असा संतप्त सवाल वाहनधारक व स्थानिक नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
चौकट..
महिन्याभरातच खड्डे
या महामार्गावर डांबरीकरण करण्यात आल्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला होता. मात्र, महिन्याच्या आत डांबरीकरण उखडून रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडायला लागले आहेत. त्यामुळे पुन्हा वाहनचालकांना खड्ड्याचा सामना करावा लागू नये, याची प्रशासन दक्षता घेणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. डांबरीकरण केलेल्या रस्त्याला महिन्याच्या आत खड्डे पडल्याने कामाचा दर्जा दिसून येत आहे.
कोट -
या मार्गावर फुटाफुटाचे खड्डे पडल्याने काटेरी झाडेझडपे असल्यामुळे पादचारी किंवा दुचाकीस्वार खाली उतरू शकत नाही, अशी अवस्था काही ठिकाणी आहे. डांबरीकरण झाल्यापासून या रोडवर दुचाकीस्वारांचे दोन अपघात झाले असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
-मारुतराव बागल, नागरिक, कातरखटाव.
२३कातरखटाव
फोटो ओळ - दहिवडी-मायणी या महामार्गावर साईटपट्यावर जेसीबीने मोठमोठे दगड, काळी माती टाकलेली दिसून येत आहे. ( छाया : विठ्ठल नलवडे )