रामापूर : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि पाटण महलातील प्रमुख असलेल्या सुंदरगडावर (दातेगड) ३६२ व्या स्वराज्य प्रवेश दिनानिमित्त चौथे शिवकाव्य संमेलन उत्साहात पार पडले. या काव्यसंमेलनास कवींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत शिवरायांवरील कविता सादर केल्या. या वेळी गडावरील वातावरण शिवमय झाले होते.
स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी केल्यानंतर केलेल्या दक्षिण मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांनी १५ नोव्हेंबर १६५९ रोजी सुंदरगड स्वराज्यात सामील करून घेतला. याची आठवण कायम ताजी राहावी, या अनुषंगाने पाटण महलातील प्रमुख सुंदरगडावर शिवकाव्य संकल्पना सुरू करण्यात आली. या गडावर होणारे हे देशातील व महाराष्ट्रातील चौथे श्री शिवकाव्य संमेलन’ पाटण महालातील किल्ले सुंदरगडावर पार पडले.सोमवारी सकाळी दहा वाजता कवी प्रदीप कांबळे यांच्या हस्ते शिव प्रतिष्ठापना, दुर्गपूजन, ध्वजपूजन, देवतापूजन करण्यात आले. या वेळी दीपक प्रभावळकर, इतिहासकार व अभ्यासक घनशाम ढाणे, वनपाल लोखंडे, माजी सरपंच नारायण डिगे, पत्रकार विक्रांत कांबळे व नितीन खैरमोडे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रदीप जाधव, अनिल बोधे, पतंगराव घाडगे, काशिनाथ विभूते, चंद्रहार निकम यांच्यासह कवींनी कविता सादर केल्या. इतिहास संशोधक घनशाम ढाणे यांनी कवी भूषण यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत कविता सादर केल्या. या वेळी दीपक प्रभावळकर यांनीही मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी प्रदीप कांबळे म्हणाले, ‘सुंदरगडावर होणारे हे महाराष्ट्रातील पहिलेच शिवकाव्य संमेलन असून हा स्तुत्य उपक्रम आहे. या शिवकाव्य संमेलनामुळे शिवप्रेमींच्या मनामनात चैतन्य निर्माण झाले आहे. अठरापगड जातीतील लोकांना एकत्रित करून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. या स्वराज्याचे आपण मावळे असून याचा अभिमान बाळगला पाहिजे. छत्रपतींचे स्वराज्य आपण सर्वांनी टिकविले पाहिजे. ऐतिहासिक गड, किल्ले, जुन्या वास्तूंचे आपण जतन केले पाहिजे. आजच्या युवा पिढीने छत्रपतींचे विचार आत्मसात केले पाहिजेत.’शंकरराव कुंभार यांनी शिवप्रेरणा स्रोत सांगितला. शिवकाव्य संमेलनास अनिस चाउस, पंकज मुळे, संतोष लोहार, राजेंद्र भिसे, नीनु साळुंखे, सचिन महाराज शिंदे, नीलेश फुटाणे, दादा सावंत, माजी सरपंच नारायण डिगे, वेदांत कुंभार, रोहन कुंभार, श्लोक बोधे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते. अॅड. सौरभ देशपांडे यांनी बहारदार शैलीत सूत्रसंचालन केले. चंद्रहार निकम यांनी प्रास्ताविक केले. अनिल बोधे यांनी स्वागत केले.