शिरवळ : पुण्यातील मटका किंग संजय सुभाष पाटोळे (वय ३६, रा.अपर, बिबवेवाडी, पुणे) याच्या खुनाचा उलगडा त्याच्या खिशात सापडलेल्या हाॅटेलच्या बिलावरून झाला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. अवघ्या १२ तासांत पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह सहा जणांना अटक केली. हा खून आर्थिक व्यवहारातून झाला असल्याचे तपासात उघड झाले.शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीमध्ये फूलमळ्यालगत एका अपार्टमेंटच्या टेरेसवर पुण्यातील मटका किंग संजय पाटोळे याचा रविवारी सायंकाळी अज्ञाताने गोळी झाडून खून केला होता. या घटनेनंतर शिरवळ पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करत असताना पोलिसांना मटका किंग संजय पाटोळे याच्या खिशामध्ये पोलिसांना हाॅटेलमध्ये जेवण केलेल्याचे बिल सापडले. यावरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.ज्या हाॅटेलमध्ये संजय पाटोळेने जेवण केले. त्या हाॅटेलमध्ये पोलीस पोहोचले. पोलिसांनी हाॅटेलमधील सीसीटीव्ही पाहिले असता पाटोळेसोबत काहीजण जेवण करत असल्याचे दिसले. त्यापैकी एकजण मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यानंतर मात्र, पोलिसांचा तपास वेगाने सुरू झाला. एक पथक थेट पुण्यात पोहोचले. या पथकाने पुणे पोलिसांच्या मदतीने एका एका आरोपीला पुण्यातील विविध भागांतून शस्त्रासह अटक केली.रेकॉर्डवरील मोक्क्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी व या खुनातील मुख्य सूत्रधार तबरेज मेहमूद सुतार (वय ३१,रा. वरखडेनगर,कात्रज ,पुणे), किरण बबनराव साळुंखे (रा.आंबेगाव पठार,पुणे), विकी राजेंद्र जाधव (रा.वानवडी ,पुणे ), शंकर उर्फ तात्या आश्रुबा पारवे (रा. सुखसागर ,बिबवेवाडी), नितीश उर्फ नित्या सतीश पतंगे (बिबवेवाडी,पुणे), राकेश सुरेश गायकवाड (रा.पुणे) या सहा जणांचा त्यामध्ये समावेश आहे. या सर्वांना शिरवळ येथे आणण्यात आले.पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर मटका किंग संजय पाटोळे याच्या खुनाचा उलगडा झाला. आरोपी तरबेज सुतार आणि मटका किंग संजय पाटोळे याचे पैशाच्या देवाण-घेवाण आणि जमिनीच्या कारणावरून वाद झाला होता. हे दोघे एकमेकांना जीवे मारण्याची धमकी देत होते. मटका किंग संजय पाटोळे हा आपला गेम करण्यापूर्वीच त्याचा काटा काढू, असा कट रचून तरबेज सुतारने आपल्या साथीदारांच्या मदतीने कट तडीस नेल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.सारेच अधिकारी शिरवळमध्येमटकाकिंग संजय पाटोळे याचा खून झाल्यानंतर सारेच अधिकारी शिरवळमध्ये आले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ,
शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, साहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ आदींचा यामध्ये समावेश होता. दरम्यान, सोमवारी सायंकाळी अधीक्षक बन्सल यांनी पत्रकार परिषद घेऊन या गुन्ह्यांसंदर्भात माहिती दिली. तसेच अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी तपास पथकाला बक्षीस जाहीर केले.पिस्तूल सापडले, पण गोळी नाहीसंजय पाटाेळे याच्या नाकातून गोळी आरपार बाहेर पडली. इमारतीच्या शेजारीच ओढा आहे. या ओढ्यामध्ये गोळी पडली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. त्याचे कारण म्हणजे पाटोळेचे शवविच्छेदन केल्यानंतरही त्याच्या डोक्यात गोळी सापडली नाही. आता ही गोळी शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.टेरेसवर कसे आले, हे मात्र, गुलदस्त्यातसंजय पाटोळेला घेऊन मारेकरी इमारतीच्या टेरेसवर कसे आले. संबंधित इमारतीमधील कोणते कुटुंब मारेकऱ्यांच्या ओळखीचे होते, हे मात्र, अद्याप समोर आले नाही. पोलीस अटक केलेल्या आरोपींकडे कसून चाैकशी करत आहेत.