सातारा/पाटण/मेढा : सातारा, कऱ्हाड, पाटण, कोरेगाव, आणि जावळी तालुक्यांत झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत सहाजण ठार झाले असून, सहा जखमी आहेत. जखमींवर कऱ्हाडमध्ये उपचार सुरू आहेत. जावळी तालुक्यातील अपघातात यशवंत भिलारे, संतोष जांभळे. पाटण तालुक्यात ज्ञानदेव शिद्रूक, तर शिवथर येथील अपघातात नवनाथ सकुंडे हे ठार झाले, तर कऱ्हाड येथ रस्त्याकडेला बसलेली वृद्धा ठार झाली आहे. वर्धनगड घाटात तरुण ठार झाला.घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुसुंबीमुरा हद्दीत चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रॅक्टर रस्ता सोडून सुमारे पंचवीस ते तीस फूट खाली पडला. यामध्ये चालक यशवंत शंकर भिलारे (वय ३५) व संतोष राजाराम जांबळे (३८, दोघे रा. शेते, ता. जावळी) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात बुधवारी रात्री झाला. दोघेही शेतीच्या नांगरटीसाठी ट्रॅक्टर घेऊन सांगवी, मुरा, कुसुंबीमुरा परिसरात गेले होते. रात्री नांगरट उरकून ते मेढ्याकडे परतत होते. कुसुंबीमुरा हद्दीत आले असता ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रॅक्टर (एमएच १२ बीबी ३७१३)े उलटला गेला. यामध्ये दोघेही ट्रॅक्टरखाली चिरडले गेले. या मार्गावरून निघालेल्या एका वाहनचालकाच्या निदर्शनास हा अपघात आला. त्यानंतर ग्रामस्थांनी ट्रॅक्टरखालून दोघांना बाहेर काढले. याबाबत शरद जांभळे यांनी मेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक भीमराव झांजुर्णे तपास करीत आहेत. दुसरा अपघात कऱ्हाड-चिपळूण मार्गावरील तामकडे औद्योगिक वसाहतीजवळ गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास झाला. वडाप जीपला ट्रकने पाठीमागून ठोकर दिली. यामुळे जीप रस्त्यावरील तीस फूट खोल नदीपात्रात कोसळली. यामध्ये ज्ञानदेव जोती शिद्रूक (वय ६०, रा. शिद्रूकवाडी, ता. पाटण) हे ठार झाले. तर जीपमधीलच कांताबाई दत्तात्रय पवार (रा. तामकडे), प्रतिभा गणेश कारंडे, गणेश आनंदा कारंडे (दोघे रा. ढेबेवाडी), सुलोचना दिनकर लुगडे (रा. लुगडेवाडी येरफळे), उषा अशोक पडवळ (रा. जुई प्लाझा, पाटण) तसेच लक्ष्मीबाई धनाजी पवार हे सहाजण जखमी झाले. जीपचालक प्रकाश सुरेश साळुंखे (रा. झाकडे कुसवडे) यांनी पाटण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जनावरांचे खाद्य आणण्यासाठी ते जीप घेऊन पाटणला गेले होते. त्यानंतर मणेरी गावाकडे प्रवासी घेऊन जात असताना नेरळे गौंड येथे भरधाव मालट्रक (एपी ०२ पीसी ११४४) ने ठोकर दिली. त्यामुळे जीप (एमएच ११ एच ७३३५) कोयना नदीपात्रात कोसळली. मालट्रक व चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील पाच अपघातांत सहा ठार
By admin | Published: December 29, 2016 11:06 PM