कऱ्हाडात लॉकडाऊनच्या काळात घरपोच भाजीपाला कीट पोहोच केले जाणार आहे. त्यासाठी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी नियोजन केले आहे. संबंधितांना पास दिल्यानंतर किराणा, भाजीपाला घरपोहोच देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. लॉकडाऊनमुळे पालिकेने प्रभागनिहाय यादी केली आहे. त्यानुसार व्यापाऱ्यांना परवानगी दिली जाणार आहे. परवानगी दिली जाणाऱ्या व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यास पालिकेने सुरुवात केली असून मंगळवारी दिवसभरात ११७ व्यापाऱ्यांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये सहा व्यापारी कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे अन्य व्यापाऱ्यांचीही तपासणी करावी लागणार आहे.
भाजी विक्री केंद्रांची संख्या विचारात घेऊन वितरणाचे नियोजन केले जात आहे. भाजीपाला, किराणा घरपोहोच मिळावा, यासाठी पालिका प्रयत्नशील असून त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मोबाईलद्वारे मागणी नोंदविणाऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे त्या वस्तू घरपोहोच केल्या जाणार आहेत. त्यासाठी स्वयंसेवक नियुक्त केले जाणार असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले.